बार्शी तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढले दुपटीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:21 AM2021-02-12T04:21:15+5:302021-02-12T04:21:15+5:30
बार्शी हा अवर्षणप्रवण तालुका म्हणून ओळखला जातो़ तालुक्यात नीलकंठा, भोगावती, नागझरी, चांदणी व रामनदी या चार प्रमुख नद्या ...
बार्शी हा अवर्षणप्रवण तालुका म्हणून ओळखला जातो़ तालुक्यात नीलकंठा, भोगावती, नागझरी, चांदणी व रामनदी या चार प्रमुख नद्या आहेत़ तसेच पाच मध्यम प्रकल्प देखील आहेत़ यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे तालुक्यातील हे सर्व लघू व मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत़ तसेच ओढे-नाले, नद्यादेखील जास्त दिवस वाहिल्यामुळे यंदा पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे़ तालुक्यातील विहीर व बोअरच्या पाणी पातळीतही वाढ झाली.
दोन वर्षापूर्वी तालुक्यातील उसाचे क्षेत्र अडीच हजार हेक्टरवर होते, मात्र यंदा पावसामुळे पाण्याची उपलब्धता झाल्याने मागील तीन महिन्यांपासून उसाच्या लागवडी गावोगावी सुरू झाल्या आहेत़ अद्यापदेखील लागवडी या सुरूच आहेत़ या लागवडी मार्च अखेरपर्यंत सुरूच राहतील, असे तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम यांनी सांगितले़
आठ हजार हेक्टरपर्यंत वाढू शकते क्षेत्र
२०१८-१९ मध्ये तालुक्यात उसाचे क्षेत्र हे २००० हेक्टर होते़ १९-२० मध्ये ते ३५०० हेक्टर झाले़ यंदा २०२०-२१ मध्ये ते सहा हजार हेक्टरवर गेले़ पुढील दोन महिन्यात त्यात आणखी दोन हजार हेक्टची वाढ होऊन ते ८ हजार हेक्टरवर पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे़
संतनाथ, आर्यन बंद, इंद्रेश्वर, बबनराव शिंदे कारखाना सुरू
बार्शी तालुक्यात पूर्वी संतनाथ सहकारी साखर कारखाना होता; मात्र तो मागील १० ते १२ वर्षांपासून बंदच आहे़ त्यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादकांची मोठी परवड होत होती़ तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढण्याला मर्यादा आल्या़ त्यानंतर माजी मंत्री दिलीप सोपल यांनी खामगावला आर्यन शुगरची उभारणी केली़ तो त्यांनी दुस-याला विकला, मात्र तो कारखानादेखील बंदच आहे़ उपळाई ठोंगे येथील माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंद्रेश्वर साखर कारखाना काढला तो सुरू आहे, मात्र त्या कारखान्याचे कार्यक्षेत्र हे आसपासच्या पाच-सहा तालुक्यात असल्यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादकांनादेखील म्हणावा तसा न्याय मिळत नाही़ तांत्रिकदृष्या बार्शी तालुक्यात असलेला रणजित शिंदे यांचा तुर्कपिंपरीचा बबनराव शिंदे साखर कारखान्याचे ऊस गाळपासाठी प्राधान्य हे माढा तालुक्यातील उसालाच आहे़
नऊ कारखान्याला जातो गाळपासाठी ऊस
तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक-यांसाठी हक्काचा कारखाना नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हे आसपासच्या अनेक कारखान्यांचे सभासद आहेत़ त्यांचा ऊस हा तालुक्यातील उपळाईचा इंद्रेश्वर, तुर्कपिंपरीचा बबनराव शिंदे, म्हैसगावचा विठ्ठल शुगर, अनगरचा लोकनेते शुगर, सोनारी ता़ परांडाचा भैरवनाथ शुगर, इंडा ता परांडाचा बाणगंगा सहकारी, पिंपळनेरचा विठ्ठलराव शिंदे, बीबीदारफळचा लोकमंगल शुगर आणि उस्मानाबाद तालुक्यातील चोराखळीचा धाराशिव शुगर या नऊ कारखान्याला गाळपासाठी जातो़
या गावात आहे सर्वाधिक उसाचे क्षेत्र
तालुक्यातील देवगाव, बाभुळगाव, पांगरी, घारी, चिखर्डे, पानगाव, उंडेगाव, साकत, पिंपळगाव पा., महागाव, यावली, शेंद्री, वांगरवाडी, खांडवी, बावी, घाणेगाव, पिंपरी पा., कळंबवाडी पा., जामगाव पा., कव्हे, कासारवाडी, हत्तीज, हिंगणी आर., चिंचखोपन, सारोळे, भांडेगाव, ज्योतीबाचीवाडी, अंबाबाईचीवाडी, जवळगाव, मानेगाव, भालगाव, उपळेदुमाला, हळदुगे, नांदणी, रुई व धामगाव दुमाला या गावात ५० हेक्टर ते ५०० हेक्टरपर्यंत उसाचे क्षेत्र आहे़ सर्वाधिक क्षेत्र सारोळे, आंबेगाव व नांदणी या गावात आहे़