ग्रामपंचायत निवडणूक प्रचारात ऊस गाळप ठरतोय कळीचा मुद्दा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:55 AM2021-01-13T04:55:20+5:302021-01-13T04:55:20+5:30
त्यासाठी लहान-मोठ्या शेतकऱ्यांना कोणताही विचार न करता ऊस तोडणीसाठी टोळ्या दिल्या जात आहेत. काही कारखान्यांना आपल्याकडे तोडणी- वाहतूक यंत्रणा ...
त्यासाठी लहान-मोठ्या शेतकऱ्यांना कोणताही विचार न करता ऊस तोडणीसाठी टोळ्या दिल्या जात आहेत. काही कारखान्यांना आपल्याकडे तोडणी- वाहतूक यंत्रणा कमी असल्याने अडचणी येत असल्याने त्यांनी परजिल्हा, परतालुक्यातील कारखान्यांची मनधरणी करत ऊस गाळपाला भाग पाडत त्या शेतकऱ्यांचा फायदा आपल्याच गटाला कसा होईल, याचीही व्यूहरचना आखली जात आहे. शिवाय इतर गटातील आपल्याला समर्थन करणाऱ्या शेतकऱ्यांचाही ऊस गाळपाला नेण्यासाठी धडपड सुरू आहे. कारखानदारांनी ऐन निवडणुकीत शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या या उपक्रमामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मात्र चांदी असून ऊस नेण्यासाठी प्रत्येक वेळी मनधरणी करावी लागणाऱ्या शेतकऱ्यांना निवडणुकीपुरते का असेना सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे.
भाऊभावकी, पाव्हण्या-रावळ्यांच्या राजकारणाला ऊत
स्थानिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका कोणत्याही एका पक्षाच्या नेत्याच्या नावावर न लढता स्थानिक आघाड्या करून लढविल्या जात असल्याचा आजवरचा इतिहास आहे. पाव्हणे-रावळे, भाऊभावकीच्या समीकरणामुळे या स्थानिक आघाड्या कमालीच्या यशस्वी झाल्याची आजवरची उदाहरणे आहेत. यावर्षीही तालुक्यात दुरंगी, तिरंगी लढतीसह काही गावांमध्ये बहुरंगी लढती लक्ष वेधून घेत आहेत. या निवडणुकांमध्ये गट-तट, स्थानिक आघाड्या झाल्यानंतरही पाव्हणे-रावळे, भाऊ-भावकी यांची समीकरणे जुळवून विजयासाठी प्रयत्न केले जात आहेत. काही ठिकाणी तर आपल्या पाव्हण्याचा पाव्हुणा त्यांच्यामार्फत निरोप देऊन किमान एक शिक्का तरी आपल्याला मिळावा, यासाठी हालचाली सुरू आहेत. या समीकरणांमुळे मागील कित्येक वर्षे कधीच एकत्र न दिसलेल्या भाऊभावक्या, पावणे-रावळे आपले मतभेद विसरत मदतीसाठी जिवाचे रान करताना दिसत आहेत.