ऊस वाहतूकदारांना मुकादमांकडून गंडा

By admin | Published: December 18, 2014 10:05 PM2014-12-18T22:05:27+5:302014-12-19T00:26:04+5:30

मजूर आलेच नाहीत : सुमारे ५0 ते ६0 कोटींचा फटका

Sugarcane traffic | ऊस वाहतूकदारांना मुकादमांकडून गंडा

ऊस वाहतूकदारांना मुकादमांकडून गंडा

Next

प्रकाश पाटील - कोपार्डे --साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी झाला आहे. बहुतांश ऊस वाहतूक करणारे वाहनमालक मजूर बीड, उस्मानाबाद लातूर, जत, बार्शी या भागातून आणतात. यासाठी या ऊसतोड मजुरांना वाहनमालकांना मोठ्या प्रमाणात रक्कम अ‍ॅडव्हान्स म्हणून द्यावी लागते; पण अलीकडच्या काळात या ऊसतोड मजुरांकडून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.
यावर्षी तर जिल्ह्यातील कारखान्यांना ऊसवाहतूक करणाऱ्या वाहनमालकांकडून लाखोंची उचल करूनही किमान १२५ ते १५० ऊसतोड मजूर टोळ्या न आल्याने ५० ते ६० कोटींचा वाहनमालकांना गंडा बसला आहे.
यावर्षी ऊसदर आंदोलनाची तीव्रता कमी झाल्याने साखर कारखान्यांचे गाळप हंगाम नोव्हेंबरमध्येच सुरू झाले आहेत. जिल्ह्यात ऊस वाहतूक व तोडणीची एक पद्धत तयार आहे. यानुसार ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनमालकांना ऊसतोड मजुरांच्या टोळ्या करण्यासाठी अ‍ॅडव्हान्स दिली जाते.
वाहनमालक ती घेऊन ऊसतोड मजूर पुरवठा करणाऱ्या मुकादमाला देतात. हा अ‍ॅडव्हान्स मुकादम सर्वसाधारण आॅगस्ट महिन्यात ऊसतोड मजुरांना पैसे देण्यासाठी घेत असतो. यावेळी कारखाने ज्या वाहनमालकाला हे पैसे अ‍ॅडव्हान्स द्यावयाचे आहे, त्यांच्याबरोबर करार करतात. त्यासाठी किमान चार मोठे शेतकरी जामीन घेतले जातात. त्यामुळे कारखान्यांच्या पैशाला हमी राहते.
मात्र, वाहनमालक ज्या मुकादमाला अ‍ॅडव्हान्स म्हणून पैसे देतात. त्यांच्याकडून कोणतीच हमी न घेता केवळ विश्वासावर ८ ते १० लाख रुपये दिले जातात. मात्र, अलीकडे या मुकादमांकडून मोठ्या प्रमाणात विश्वासघात होत असून, पैसे उचलायचे मात्र ऊसतोड मजूर पुरवायचेच नाहीत, असा प्रकार सुरू आहे. त्यामुळे वाहनमालकाचे वाहन एक तर बंद करून उभे ठेवावे लागते. त्याशिवाय ८ ते १० लाख रुपये मजुरांना देण्यासाठी हकनाक बुडाल्याने व त्याला वाहनमालकालाच जबाबदार धरले जाते. एवढ्या मोठ्या रकमेची भरपाई करायची कोठून हा यक्षपश्न या वाहनमालकांसमोर आहे. त्याशिवाय या रकमेला व्याज आकारले जाते ते वेगळेच. यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनमालकांच्यापुढे आत्महत्येशिवाय पर्यायच उरलेला नाही.


१० ते १५ लाखांचे वाहन, ऊसतोड मजुरांसाठी एक टोळीला १० ते १२ लाखांचा अ‍ॅडव्हान्स देणे. डिझेलचे वाढलेले दर व कामापेक्षा मजुरांकडून होणारी जादा ऊचल यामुळे ऊस वाहतूक वाहन मालक म्हणजे व्याजात पिसणी झाले आहे. एवढे करूनही संपूर्ण हंगामात ५० ते ६० हजारांचे वाहन मालकांकडे शिल्लक राहते. त्यापेक्षा ५० रुपयांचा कोयता घेऊन ऊसतोड केल्यास किमान हंगामात ५० ते ६० हजारांचा धंदा होतो. त्याशिवाय जनावरांना वैरण मिळून शेतीची कामेही पाहता येतात. - विजय पाटील,
वाहन मालक, कुडित्रे,

ऊसतोड मजुरांची
पटपडताळणी घोषणा हवेतच
भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी या प्रकरणातील दाहकता अनुभवली होती. यासाठी त्यानां स्वत: माजी कृषिमंत्री शरद पवार यांना शाळा पट पडताळणी प्रमाणे ऊसतोड मजुरांचीही पटपडताळणी करण्याची यंत्रणा निर्माण करावी, अशी विनंती केल्यानंतर सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व कृषिमंत्री बाळासाहेब विखे-पाटील यांनी २०११-१२ मध्ये ऊसतोड मजुरांची पटपडताळणी करण्याची घोषणा केली होती; पण ती हवेतच विरली.

हंगाम सुरुवातील मराठवाड्यात ऊसतोड मजूर मुकादमांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या. वाहनमालकांच्यावतीने त्यांना विनंती केली, तरीही १५ ते २० टोळ्या आलेल्या नाहीत. त्यामुळे वाहनमालक, कारखाना यांचे नुकसान होत आहे. ही परिस्थिती जिल्ह्यातील सर्वच कारखान्यात आहे.
- सुरेश अपराध, शेती अधिकारी, कुंभी-कासारी

जिल्ह्यातील किमान १२५ ते १५० मजूर टोळ्या ऊसतोडीसाठी आल्याच नाहीत

एकेका वाहनमालकांच्याकडून १० ते १२ लाख रुपये ऊसतोड मजुरांची उचल


५० ते ६० कोटी रुपये उचल करून ऊसतोड मजूर आलेच नाहीत

Web Title: Sugarcane traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.