दोन महिन्यांपासून ऊसतोड कामगारांना डांबून ठेवले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:25 AM2021-05-25T04:25:40+5:302021-05-25T04:25:40+5:30
याबाबत अधिक माहिती अशी की, जालना येथील घुले व अतागळे ही दोन ऊसतोड कामगार कुटुंबे दोन वर्षांपासून ऊसतोडणीसाठी माढा ...
याबाबत अधिक माहिती अशी की, जालना येथील घुले व अतागळे ही दोन ऊसतोड कामगार कुटुंबे दोन वर्षांपासून ऊसतोडणीसाठी माढा तालुक्यातील बादलेवाडी येथील भरत त्रिंबक आलदर यांच्याकडे मजूर म्हणून येत होती. परंतु चालू वर्षीचा गळीत हंगाम संपून दोन महिने झाले तरी भरत आलदर हा शेतकरी घुले व अतागळे या दोन कुटुंबीयांना त्यांच्या गावाकडे जाऊ देत नव्हता. त्यांना बंदिस्त करून शेतावरच ठेवले होते. त्यांच्याकडून पडेल ते काम करून घेऊन त्यांना फक्त जेवणापुरते पैसे दिले जात होते.
२० मे रोजी बंदिस्त कुटुंबातील मारिया बबलू घुले (३८) या महिलेने आजारी असल्याचा बहाणा करून दवाखान्यात जाऊन येतो म्हणून मारिया घुले, तिची आई शीलाबाई व ९ वर्षांचा मुलगा पवन हे तिघे टेंभुर्णीला आले व तेथून त्यांनी जालना गाठले.
जालना येथे गेल्यानंतर हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. नातेवाइकांनी मारियाला घेऊन शनिवार २२ मे रोजी जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांचे संपर्क कार्यालय गाठले व घडलेला प्रकार त्यांना सांगितला. त्यानुसार आमदार गोरंट्याल यांनी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्याशी संपर्क साधला. अधीक्षकांच्या सूचनेवरून जालना पोलीस ठाण्यात मारिया घुले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
पथक रवाना
जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास सोनवले यांच्या नेतृत्वाखाली एक पोलीस पदक शनिवारीच टेंभुर्णीकडे पाठवले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवले पथकासह रात्रीचा प्रवास करून पहाटे तीन ३ वाजता टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दाखल झाले. तेथे टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे हवालदार हेड कॉन्स्टेबल बिरू मारकड यांना बरोबर घेऊन जालना पोलिसांचे पथक पहाटे ५ वाजता बादलेवाडी येथील भरत आलदर यांच्या शेतात दाखल झाले. तेव्हा भरत आलदर हे झोपेतच होते. पथकातील पोलिसांनी त्यांंना झोपेतून उठवून ताब्यात घेतले. नंतर पोलिसांनी बंदिस्त करून ठेवलेल्या ऊसतोड कामगारांच्या ९ सदस्यांची सुटका केली व त्यांना घेऊन पोलीस पथक जालन्याकडे रवाना झाले.
यांची झाली सुटका
बबलू गणेश घुले (वय ४० ), मारिया बबलू घुले (वय ३८), सोनाली बबलू घुले (१६), नेहा बबलू घुले (१३), अजय राजाभाऊ अतागळे (३७ ), रेश्मा अजय अतागळे (२३), आराधना अजय अतागळे (६), अर्चना अजय अतागळे (३) व दादा अजय अतागळे (दीड वर्ष).
---
सासरा-जावयास अटक
भारत त्रिंबक आलदर (रा. बादलेवाडी) या शेतकऱ्याचे सासरे दिगंबर आसाराम माने (रा. कवड गावथडी ता. अंबड, जि. जालना) यांनी हे मजूर आलदर यांच्याकडे पाठविले होते. या ऊसतोड मजुरांना चालू गळीत हंगाम संपून दोन महिने झाले तरी गावाकडे जाऊ दिले जात नव्हते. त्यांना दमदाटी करून व पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास जेसीबीने पुरून टाकू अशी धमकी देऊन बंदिस्त करून ठेवले होते.
टेंभुर्णी पोलिसांनी भरत त्रिंबक आलदर व दिगंबर आसाराम माने या सासरे जावयांना शनिवारी अटक केली आहे. पुढील तपास टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे हवालदार बिरू मार्कड करीत आहेत.
-----
२४टेंभुर्णी
बादलेवाडी येथून सुटका केलेले ऊस तोड कामगार कुटुंबीय.