सासरच्या जाचहाटाला कंटाळून वाफळ्यात विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:28 AM2021-02-25T04:28:35+5:302021-02-25T04:28:35+5:30
मोहोळ : चुलत दिरासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशयावरुन पती, ...
मोहोळ : चुलत दिरासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशयावरुन पती, सासू आणि सासरे यांनी केलेल्या जाचहाटाला कंटाळून एका २२ वर्षीय विवाहितेने बाथरुममध्ये लोखंडी अंगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मोहोळ पोलिसांनी चुलत दिरासह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
उज्ज्वला गणेश चव्हाण (वय २२) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. २१ फेब्रुवारी रोजी वाफळे येथे तिने आत्महत्या केली. याप्रकरणी मोहोळ पोलिसांनी तिचा चुलत दीर ज्योतिराम उर्फ नाना शंकर चव्हाण, नवरा गणेश चव्हाण, सासू मालन चव्हाण, सासरा शिवाजी दिगंबर चव्हाण या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
उज्ज्वाच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसा शेटफळ (ता. मोहोळ) येथील उज्वला उर्फ पिंकू हिचा विवाह वाफळे येथील गणेश शिवाजी चव्हाण यांच्याशी २०१८ साली झाला. लग्नानंतर सासरचे लोक व्यवस्थित नांदवत होते. मात्र मागील चार महिन्यांपासून हे लोक चुलत दीर ज्योतिराम उर्फ नाना शंकर चव्हाण याच्याशी तिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन त्रास देणे सुरु केले. उज्ज्वलाच्या आई-वडिलांशी संपर्क साधून तीला घेऊन जा असे सांगितले.
त्यानुसार तिची आई प्रेमल मधुकर डोंगरे (रा. शेटफळ) यांनी उज्ज्वलास आठ दिवसासाठी शेटफळ येथे माहेरी आणले होते.
अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल देवडे करीत आहेत.
---
चुलत दिराच्या आई-वडिलांपुढे मांडली होती कैफीयत
माहेरी आल्यानंतर आईवडिलांनी उज्वलास विश्वासात घेऊन विचारपूस केली होती. तिने चुलत दीर ज्योतिरामच्या वागण्याबाबत आई-वडिलांसमोर कैफीयत मांडली होती. तुझा नवरा तुला शोभत नाही म्हणत तो शरीर सुखाची मागणी करत असल्याची तक्रार तिने केली होती. यानंतर उज्वलाच्या आई-वडिलांनी वाफळे येथे जाऊन ज्योतिरामच्या आई-वडिलाची भेट घेऊन उज्ज्वलाने मांडलेली कैफीत सांगितली होती. दिराचा त्रास थांबवा अन्यथा अन्यथा त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करु अशी समज देऊन उज्वलास सासरी आणून सोडले होते. त्यानंतरही ज्योतिरामकडून त्रास सुरु राहिला. मात्र, ज्योतीरामबाबत संशय घेऊन पती, सासू, सासरे यांनी तिला त्रास देणे सुरु केले. याला कंटाळून २१ फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास तिने बाथरूममध्ये आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.