आत्महत्या हा शेवटचा पर्याय नव्हे! चला..‘निराशेकडून आशेकडे’ अनुभव घेऊ या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 03:12 PM2019-06-07T15:12:36+5:302019-06-07T15:14:14+5:30
लोकमत अन् स्पार्कचा उपक्रम: रविवारी मानसोपचार तज्ज्ञ करणार परिसंवादातून समुपदेशन
सोलापूर: हल्ली सर्वच वयोगटात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. निराशेच्या गर्तेत अडकलेल्या अशांना आपण रोखलं पाहिजे, रोखू शकतो, आत्महत्या हा शेवटचा पर्याय नव्हे या जाणिवेतून लोकमत अन् सोलापूर सायकॉलॉजिस्ट असोसिएशन अॅण्ड रिसर्च सेंटरच्या (स्पार्क) संयुक्त विद्यमाने ‘निराशेतून आशेकडे’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. रविवारी ९ जून रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत समाजकल्याण केंद्र, रंगभवन शेजारी, सोलापूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
आयुष्याच्या विविध टप्प्यावर अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. साधारणत: दहा वर्षांनंतरच्या काळात वेगवेगळ्या कारणांमुळे ताण, निराशा, राग, भीती असे मानसिक त्रास होऊ लागतात. काही ताण झेलण्यापलीकडे गेलेतर त्याचे रुपांतर निराशेत होते आणि यातून आत्महत्येसारखे विचार येतात. हे टाळण्यासासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती स्पार्क संस्थेच्या अध्यक्षा अलका काकडे यांनी दिली.
रविवारी सायंकाळी ‘सुसाईड इज प्रिव्हेंटेबल’ या नाटिकेने या कार्यक्रमाची सुरुवात होईल. यानंतर परिसंवाद आयोजित केला आहे. यात स्पार्कच्या प्रमुख अलका काकडे ‘निराशेतून आशेकडे जाताना’ या विषयातून उपस्थितांशी संवाद साधतील. यानंतर डॉ. पद्मजा गांधी ‘आत्महत्येची कारणे, लक्षणे व उपाय’ यावर आपली मांडणी करतील. डॉ. स्वाती कोरके ‘विवेकनिष्ठ विचारपद्धती व व्यसनमुक्ती’ यावर मार्गदर्शन करणार आहेत. संतोष ऐदाळे हे ‘नोकरीतील ताणतणाव’ विषयातून सद्यस्थिती मांडतील.
कार्यक्रमानंतर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून तज्ज्ञ मान्यवर उपस्थितांचे शंका-समाधान करतील. कार्यक्रमस्थळी आत्महत्येपासून परावृत्त करण्याच्या दृष्टीने प्रबोधनात्मक पोस्टर प्रदर्शनही मांडले जाणार आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन आणि सूत्रसंचालनाची बाजू मृणालिनी मोरे आणि मयूर भंडारे सांभाळणार आहेत. या कार्यक्रमास सोलापूरकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
सामाजिक जाणिवेसाठी ‘लोकमत’चा पुढाकार
- वैयक्तिक आणि सामाजिक स्वास्थ्य चांगले रहावे या जाणिवेतून सोलापुरातील काही मानसशास्त्रीय समुपदेशकांनी एकत्र येऊन स्पार्क सोलापुरात सायकॉलॉजिस्ट असोसिएशन अॅण्ड रिसर्च सेंटर सुरु केले आहे. दहावी-बारावीच्या परीक्षांचे निकाल लागताच मुलांमध्ये आत्महत्यांसारखे विचार येतात. निराशेचा सूर उमटतो. तो टाळला जावा, समाजातील विविध घटकांमधूनही असे प्रकार घडू नयेत यासाठी ‘लोकमत’ने स्पार्क सोबत सामाजिक जाणिवेतून हे पाऊल उचलले आहे. वाचकांना जगाच्या घडामोडींची माहिती देण्याबरोबरच आत्महत्यांसारख्या गंभीर विषयावर मंथन होऊन सकारात्मक विचार लोकांमध्ये पेरला जावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.