दोन मुलांसह मातेची आत्महत्या ; सरवदे नगरात धक्कादायक प्रकार
By विलास जळकोटकर | Published: March 3, 2024 08:01 PM2024-03-03T20:01:47+5:302024-03-03T20:02:05+5:30
साडीच्या सहाय्यानं गळफास : कारण गुलदस्त्यात, पोलिसांचा शोध सुरु
सोलापूर: मुळेगाव रोड येथील सरवदे नगरामध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना रविवारी दुपारी १२ च्या सुमारास उघडकीस आली. या धक्कादायक घटनेत एका मातेनं आपल्या दोन लेकरांसह गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. नागिरकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. या घटनेबद्दल एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.
स्नेहा संतोष चिल्लाळ (वय- ३०), संध्या संतोष चिल्लाळ (वय- ११), मनोजकुमार संतोष चिल्लाळ (वय- ७, सर्व रा. प्लॉट नं. ५, सरवदे नगर, जुना विडी घरकूल, सोलापूर) अशी मयतांची नावे आहेत. शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करुन मयत घोषित केले. मात्र सदर महिलेने हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबतचे गूढ अजूनही कायम आहे. हा प्रकार पाहिल्यानंतर सदर महिलेचे पती संतोष सरवदे यांनी टाहो फोडून आजूचाजूच्या लोकांना जमवले. त्यानंतर तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्याला या घटनेची खबर देण्यात आली.
पोलीस हवालदार एस. एन. गायकवाड घटनास्थळी पोहोचले. बेशुद्धावस्थेतील तिघांनाही लोकांच्या मदतीने खाली उतरवण्यात आले. रुग्णवाहिका मागवून दुपारी पावणेतीनच्या सुमारास शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांनी तपासणी करुन तिघांचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
आधी लेकरांना नंतर स्वत: गळफास
यातील महिला स्नेहा सरवदे यांनी एवढ्या टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल परिसरात तर्कवितर्क लढवले जात आहेत. नेमके कारण मात्र गुलदस्त्यात आहे. यातील मयत स्नेहा यांनी अगोदर दोन मुलांना गळफास दिला असावा त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलीस सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.