मानसिक छळ करतात म्हणत स्टेटसवर आरोपींची नावे लिहून युवकाची आत्महत्या
By काशिनाथ वाघमारे | Published: March 18, 2024 04:49 PM2024-03-18T16:49:40+5:302024-03-18T16:49:51+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेला युवक हा एका कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता.
सोलापूर : काही लोक मानसिक त्रास देऊन छळ करीत असून, त्यांना कठोर शिक्षा व्हावी, असा मजकूर टाइप करून मोबाइलवरील स्टेटसमध्ये आरोपींची नावे लिहून एका युवकाने पहाटे झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
अजिंक्य नामदेव यादव (वय २३, रा. घाटणे, ता. माढा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून, रविवार, १७ मार्च रोजी पहाटे ४:१५ वाजण्याच्या पूर्वी म्हैसगाव (ता. माढा) येथे ही घटना घडली आहे. याबाबत त्याचे वडील नामदेव संदिपान यादव (वय ४५ वर्षे, रा. घाटणे, ता. माढा) यांनी कुर्डुवाडी पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेला युवक हा एका कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. रविवारी त्याची पहाटे दोन ते सकाळी दहा वाजेपर्यंत ड्युटी होती. या दरम्यान त्याने आपल्या मोबाइलवर स्टेटस ठेवून माझ्या मरणास चोघे जण कारणीभूत असून, त्यांनी माझा मानसिक छळ केला आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करत, कोणा कोणाकडे किती पैसे येणे बाकी आहेत हेदेखील या स्टेटसमध्ये लिहून त्याने रविवारी पहाटे ४:१५ पूर्वी चिंचेच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी विकास वाघमोडे (रा. बादलेवाडी, ता. माढा), अनिल कांबळे, सचिन शिंदे (दोघे रा. निमगाव ता. माढा) व उमेश कदम (रा.घाटणे, ता. माढा) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपात्रे करीत आहेत.