कुरनूर धरणातून उन्हाळी आवर्तन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:23 AM2021-04-23T04:23:59+5:302021-04-23T04:23:59+5:30
आमदार सचिन कल्याणशेट्टी, संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यात पाणी सोडण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. यामध्ये धरणाच्या खाली असणाऱ्या गावांचा पाणीपुरवठा ...
आमदार सचिन कल्याणशेट्टी, संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यात पाणी सोडण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. यामध्ये धरणाच्या खाली असणाऱ्या गावांचा पाणीपुरवठा व्यवस्थित होण्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. यानुसार संबंधित विभागाने गुरुवारी सकाळी पाणी सोडण्याची कार्यवाही केली. यात धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. यातून ८०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे.
सध्या धरणात ५३ टक्के पाणीसाठा आहे. प्रत्येक दरवाजे एक ते दीड इंचने उघडले आहेत. शुक्रवारी दुपारपर्यंत पाणी सोडण्याची कार्यवाही सुरू असेल. यामुळे धरणातून जवळपास २० ते २२ टक्के पाणी कमी होणार आहे. सोडलेले पाणी अक्कलकोट, सांगवी, ममदाबाद, निमगाव, सातनदुधनी, रुद्देवाडी, बबलाद, सिंदखेड या बंधाऱ्यात साठवले जाणार आहे. प्रत्येक बंधाऱ्यात अडीच मीटर उंचीपर्यंत पाणी साठवून घेण्यात येणार आहे. यामुळे पाणीटंचाई दूर होईल. सोडलेले पाणी केवळ पिण्यासाठी असेल, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.
ऐन उन्हाळ्यात प्रशासनाने हा निर्णय घेतल्याने नदीकाठच्या गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे. बोरी मध्यम प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश बाबा, शाखा अभियंता रोहित मनलोर, इकालवा निरीक्षक प्रशांत लोंढे, माजी बिटधारक एन.व्ही. उदंडे, राहुल काळे यांनी पाणी सोडण्याची कार्यवाही केली.
२२कुरनूर धरण