सोलापूरचा उन्हाळा अन् आपली जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:27 PM2019-05-22T12:27:45+5:302019-05-22T12:28:08+5:30

अमर्याद जंगलतोड आणि ऊर्जेचा होणारा अतिवापर यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे.

Summer of Solapur and your responsibility | सोलापूरचा उन्हाळा अन् आपली जबाबदारी

सोलापूरचा उन्हाळा अन् आपली जबाबदारी

Next

काही दिवसांपूर्वी एका मित्राच्या लग्नाला गेलो होतो दुपारचं लग्न होत.. त्यामुळे उन्हाची दाहकता चांगलीच जाणवत होती. मंगल कार्यालयाजवळ पोहोचल्यानंतर गाडी लावण्यासाठी पार्किंगकडे गेलो तेव्हा जे समोर चित्र दिसलं ते फारच बोलकं होतं. पार्किंगसाठी प्रशस्त जागा असतानाही सर्वांनी गाड्या एका कोपºयात जशा जमतील तशा एकाच ठिकाणी लावल्या होत्या. कारण त्याच ठिकाणी दोन झाडे होती आणि फक्त तिथेच सावली होती. असेच चित्र दुपारच्या वेळेस सरस्वती चौकातील सिग्नललाही बघायला मिळते. दुपारी सिग्नलच्या इथे न थांबता सिग्नलच्या थोडं आधी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाच्या सावलीत अनेक जण थांबलेले दिसतात.

दुपारच्या वेळेस घराबाहेर पडल्यानंतर असे अनुभव प्रत्येकाने घेतलेच असतील आणि त्याचबरोबर जर दुपारी गाडी लावायला सावली नाही मिळाली तर एम.एच़ तेराकडून मिळणारा सोलापुरी झटकाही प्रत्येकाने अनुभवला असणारच. एकीकडे माळढोक या पक्ष्यांसाठी जगात असणारी सोलापूरची ओळख ही हळूहळू पुसली जात आहे़परदेशातून येणाºया फ्लेमिंगो या पक्ष्यांच्या संख्येतही घट होत चालली आहे तर दुसरीकडे दुष्काळ, वाढते तापमान, प्रदूषण आणि धूळ ही सोलापूरची नवी ओळख बनत आहे. मात्र काही संशोधक, पर्यावरणतज्ज्ञ आणि पर्यावरणप्रेमी यांना सोडलं तर याचं कुणाला काहीच पडलेलं दिसत नाही.

उन्हाळा सुरु होताच दरवर्षी फेसबुकच्या पोस्टमध्ये, व्हॉट्सअ‍ॅपच्या ग्रुपमध्ये, चहाच्या टपरीवर, बस स्टँडवर, रेल्वे स्टेशनवर, बँकांच्या रांगेत, कॉलेजच्या कट्ट्यांवर, सरकारी कार्यालयांच्या टेबलावर आणि यासारख्या अनेक ठिकाणी उन्हाळा, उन्हाची वाढती तीव्रता, दुपारच्या वेळेस निर्मनुष्य होणारे रस्ते, जिल्ह्यातील लोकांची पाण्यासाठी वाढलेली भटकंती, टँकरवर विसंबून असलेली गावं, पाणी आणि चाºयाविना होणारी जनावरांची होरपळ, पशुपक्ष्यांच्या नष्ट होत जाणाºया प्रजाती याचीच चर्चा सुरु असते, पण चर्चेच्या पुढे कधी कोण जाताना दिसत नाही. बरेच जण तापमान कमी करण्याचे नवनवीन उपायही सुचवत असतात, पण यातील कशालाच कृतीची जोड नसते. त्यामुळे परिस्थितीत कसलाच बदल होताना दिसत नाही. फक्त उन्हाळ्यापुरतंच आपल्याला झाडांचं महत्त्व प्रकर्षाने जाणवते, पण उन्हाळा संपताच ते आपल्याला महत्त्वाचे वाटत नाहीत़ या मानसिकतेत बदल होणे अत्यावश्यक आहे. 

वाढत्या शहरीकरणासाठी, आधुनिकीकरणासाठी, विकासासाठी आणि ऐशोआरामासाठी होणारी अमर्याद जंगलतोड आणि ऊर्जेचा होणारा अतिवापर यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. याचाच परिणाम म्हणून उन्हाळ्यातील तापमानाची तीव्रता आणि पावसाळ्यातील पावसाची अनियमितताही वाढतच चालली आहे़ जागतिक तापमान वाढीची ही सर्व लक्षणे आहेत. सध्या जागतिक तापमान वाढ हे जगासमोरील सर्वात मोठे संकट आहे. ही परिस्थिती उद्भवण्यासाठी सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत. त्यामुळे यामध्ये सुधारणा करणे हे आपल्या प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. आपल्या येणाºया पिढ्यांना आपण नक्की कसला वारसा देणार आहोत, याचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. या परिस्थितीत जर बदल घडवायचा असेल तर एकच उपाय आहे तो म्हणजे ‘वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन’. 

 चला तर मग येणारे उन्हाळे सुसह्य करण्यासाठी वृक्षारोपणाच्या कृतीसोबतच ऊर्जेचाही अपव्यय टाळून तिचा काटकसरीने वापर करणे, पाणी जपून वापरणे, वाहतुकीसाठी वैयक्तिक वाहनांचा वापर टाळून जास्तीत जास्त सार्वजनिक वाहनांचा वापर करणे, एसी, फ्रीज यासारख्या उपकरणांचा गरजेपुरताच वापर करणे या गोष्टी आत्मसात करू आणि वाढते तापमान, दुष्काळ, प्रदूषण, धूळ नि सोलापूर याचं दृढ होत जाणारं नातं संपवून जगाला सोलापूरच्या नव्या दुनियादारीचे दर्शन घडवू.
-प्रा. अमित बनसोडे
(लेखक शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.) 

Web Title: Summer of Solapur and your responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.