Sunday Motivation; काठावर पास होणारे धानय्या कौटगीमठ २५ ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 04:22 PM2019-03-03T16:22:15+5:302019-03-03T16:26:37+5:30
जगन्नाथ हुक्केरी । सोलापूर : कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर तोळणूर गाव. हॉटेल व्यावसायिक, पण अशिक्षित कुटुंबात जन्म. शिक्षणाचा फारसा वारसा नसताना ...
जगन्नाथ हुक्केरी ।
सोलापूर : कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर तोळणूर गाव. हॉटेल व्यावसायिक, पण अशिक्षित कुटुंबात जन्म. शिक्षणाचा फारसा वारसा नसताना आणि इंग्रजीला दहावीत ३६ तर बारावीत ३७ गुण. असे असतानाही ध्यास घेऊन २५ राज्यांच्या सेट, तीन नेट आणि तीन टीईटी परीक्षेत यश मिळवून वर्ल्ड रेकॉर्ड केले, ते धानय्या गुरुलिंगय्या कौटगीमठ यांनी.
तोळणूर येथील जिल्हा परिषद कन्नड शाळा, सिद्धेश्वर प्रशालेत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचे धडे घेतले. महाविद्यालयीन शिक्षण अक्कलकोटच्या सी. बी. खेडगी महाविद्यालयात तर बी. एड. अकलूज येथे केल्यानंतर २००८ साली अक्कलकोटच्या मंगरुळे प्रशालेत शिक्षक म्हणून रुजू झाले. दहावी व बारावीला कमी गुण मिळाल्याचे शल्य नसले तरीही यातील कसूर भरून काढण्याच्या नादात धानय्या कौटगीमठ यांनी सेट, नेट परीक्षेची तयारी सुरू केली.
विद्यार्थ्यांना शिकवत ते शिकत गेले. पहिल्यांदा त्यांना यशाने हुलकावणी दिली. नोकरी करून उरलेल्या वेळेत आठ ते बारा तास अभ्यास करून यश खेचून आणलेच. पण ते यश असे तसे नव्हते तर जगाने त्याची कदर केली आणि वर्ल्ड रेकॉर्ड झाले. लंडनच्या विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट बहाल केली. कामगिरीवर आयत्या मिळालेल्या डॉक्टरेटवर समाधान न मानता पुन्हा ते सोलापूर विद्यापीठातून पीएच. डी. करीत आहेत.
पहिल्यांदा केरळ राज्यातून ते सेट परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर सर्व राज्यांतून ही परीक्षा देण्याची जिद्द बाळगून जम्मू-काश्मीरमधूनही ते परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले. केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम तर पूर्वोत्तर भारतातील सात राज्यांची मिळून गुवाहाटी विद्यापीठ परीक्षा घेते. त्यात ते दोनवेळा परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले आहेत.
स्पर्धा परीक्षा देणाºयांना मार्गदर्शन
एवढी पदवी घेऊन नोकरी करीत आता बस्स झाले असे न म्हणता, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळसह इतर राज्यांतील स्पर्धा परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करीत आहेत. सेट, नेट व टीईटीसाठी नऊ पुस्तकांचे लेखन केले असून, चार पुस्तक प्रकाशित आहेत.