सुनील कामाटी आले.. संजय कोळीही आले; जबाबासाठी ठाण्यात वेगळ्या खोलीत बसले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 01:11 PM2018-11-24T13:11:42+5:302018-11-24T13:12:04+5:30
सोलापूर : इतके दिवस भाजपाचे नगरसेवक सुरेश पाटील यांच्यासोबत वावरणारे सभागृह नेते संजय कोळी यांनाही जबाबातील काही संदर्भासाठी जोडभावी ...
सोलापूर : इतके दिवस भाजपाचे नगरसेवक सुरेश पाटील यांच्यासोबत वावरणारे सभागृह नेते संजय कोळी यांनाही जबाबातील काही संदर्भासाठी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याची पायरी दुसºयांदा चढावी लागली. विशेष म्हणजे, याच वेळी ठाण्यातील दुसºया खोलीत नगरसेवक सुनील कामाटी यांचाही जबाब पोलिसांनी घेतला.
थेलियम विषबाधा प्रकरणात सुरेश पाटील यांनी जोडभावीपेठ पोलिसांना संशयितांची नावे लिखित स्वरूपात दिली आहेत. यानंतर जबाब नोंदविण्यासाठी अनेक जण पोलीस ठाण्यात येत आहेत. नगरसेवक सुनील कामाटी यांना मटका सुरू करण्यास विरोध केला होता. त्यामुळे त्यांचीही चौकशी करावी, अशी सुरेश पाटलांची मागणी आहे. कामाटी यांनी पोलिसांत जबाब नोंदविला. विशेष म्हणजे, कामाटी अन् कोळी एकापाठोपाठ पोलीस ठाण्याच्या आवारात आल्याचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले.
महापौर शोभा बनशेट्टी, त्यांचे पती श्रीशैल बनशेट्टी, भाजपा शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी गुरुवारी पोलिसांत जबाब नोंदविला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आणि इतर कार्यकर्तेही उपस्थित होते. या उपस्थितीला सुरेश पाटील यांनी आक्षेप नोंदविला आहे. पोलीस अधिकारी इतर प्रकरणात संशयित व्यक्तीसोबत इतरांना येऊ देत नाहीत. त्यांना कशी वागणूक देतात, आम्ही पाहिले आहे.
पण या प्रकरणात मात्र एखादी बैठक लावून, सर्वांशी चर्चा करून जबाब घेतला जात आहे. माझ्यावर विषप्रयोग झाल्याचे सर्वांना मान्य आहे. पण हा विषय गांभीर्याने घेण्याऐवजी लोकांना मदत केली जात आहे. ज्यांचा या प्रकरणात संबंध नाही, ते राजकीय नेतेही पोलीस ठाण्यात येऊन बैठका मारत आहेत. ही गोष्ट चुकीची आहे, असेही सुरेश पाटील म्हणाले.
चोराच्या उलट्या बोंबा
- श्रीशैल बनशेट्टी यांनी केलेल्या आरोपाबाबत सुरेश पाटील म्हणाले, पालकमंत्री विजयकुमार देशमुख माझ्याबाबत वाईट विचार करणार नाहीत, याची मला खात्री आहे. त्यांनी अडचणीच्या काळात मला साथ दिली आहे. श्रीशैल बनशेट्टी म्हणतात, मी पालकमंत्र्यांच्या घरी जेवण केलं आहे. होय मी जेवण केलं आहे. पण मला खात्री आहे की, पालकमंत्री असे काहीही करणार नाहीत. श्रीशैल बनशेट्टी यांचा आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा सुरू आहेत.
नेमकं ‘लकी’ कोण?
- सभागृह नेते संजय कोळी हे सतत सुरेश पाटील यांच्यासोबत असायचे. पोलिसांनी यापूर्वीच त्यांचा जबाब नोंदविला आहे. त्यांच्या जबाबात आलेल्या नावांचे पत्ते सापडत नसल्याने त्यांना पुन्हा गुरुवारी जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात बोलावले होते. कोळी यांनी दिलेल्या जबाबात लकी हॉटेलचे नाव होते. यावर पोलिसांनी तपास केल्यावर लकी व फेमस लकी अशा दोन हॉटेलची नावे समोर आली. त्यामुळे यातल्या नेमक्या कोणत्या हॉटेलमध्ये ते गेले होते, याची पोलिसांनी चौकशी केली.
उलट मीच अण्णांच्या घरी जेवलोय...
- नगरसेवक सुनील कामाटी म्हणाले, सुरेश पाटलांसोबत तुम्ही कुठं कुठं जेवण केलं, असा प्रश्न मला पोलिसांनी विचारला. मी सुरेश पाटलांसोबत त्यांच्या घरी एकदाच जेवण केले आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी राज्याचे जलसंधारणमंत्री राम शिंदे हे सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी आले होते. त्यावेळी सुरेश पाटील यांनी दोनवेळा फोन करून मला जेवायला बोलावले होते. ते कधीही माझ्या घरी जेवायला आलेले नाहीत, तसा प्रसंगही उद्भवला नाही. या प्रकरणात माझी आणि सुरेश पाटलांची नार्को टेस्ट करावी. त्याचे पैसे भरायला मी तयार आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.