सोलापूर : ऊस दराचा तिढा कायम, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोडली 9 बैलगाड्या-3 ट्रॅक्टरची हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 12:00 PM2017-11-04T12:00:01+5:302017-11-04T12:55:49+5:30
आॅनलाइन लोकमत सोलापूर
कुर्डूवाडी दि ४ : ऊस दरावर निर्णय झाला नसून तिढा कायम आहे. यामुळे माढा तालुक्यात ऊस आंदोलनाचा वणवा पेटला असून शुक्रवार व शनिवारी कुर्डूवाडी-बार्शी रस्त्यावरील रिधोरे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणा-या नऊ बैलगाड्या व तीन ट्रॅक्टरच्या चाकातील हवा सोडली. अनेक ऊस वाहतूक वाहन चालकांना गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी करीत ऊस वाहतूक करु नका, अशी विनवणी केली.
शेतकरी संघटनेच्या या आंदोलनामुळे माढा तालुक्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सहकारमंत्री व सचिवांच्या बैठकीत एफआरपीवर कारखानदार ठाम राहिल्यामुळे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांना मान्य नसल्यामुळे बैठक फिस्कटली.
आठवड्यापासून स्वाभिमानीचे कार्यकर्ते फिरुन भाव घोषित केल्याशिवाय ऊस उत्पादकांना ऊसतोड करु नका व वाहन चालकांना ऊस वाहतूक करु नका, अशी विनवणी हात जोडून करीत होते. सहकार मंत्र्यांच्या बैठकीनंतर आपण ऊसतोड करु, असे सांगत होते. मात्र बैठक फिस्कटूनही ऊस उत्पादकांनी ऊसतोड करुन आपली वाहने कारखान्याकडे पाठविण्याचा घाट घातला होता. त्याला स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जशास तसे उत्तर दिले. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी पाटील, तालुका कार्याध्यक्ष महावीर सावळे, प्रसिध्दीप्रमुख सत्यवान गायकवाड, दत्तात्रय पंडित, मुसा शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावर्षी पाऊस चांगला झाल्याने उसाची वाढ अजून होत आहे. शेतक-यांनी उसाला तोडी घेऊ नये, कारखानदार एफआरपीवर ठाम आहेत. त्यांच्यात एकी दिसते. त्याप्रमाणे शेतकºयांनीही आपली एकजूट दखवावी. खा. राजू शेट्टी यांनी जाहीर केल्याप्रमाणे उसाचा पहिला हप्ता ३४०० रुपये जोपर्यंत कारखानदार देत नाहीत तोपर्यंत ऊस वाहतूक करु देणार नाही. आजचे आंदोलन शांततेने व गांधीगिरीने केले आहे.
-शिवाजी पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना