धक्कादायक; मीठापासून तयार केलेल्या बोगस रासायनिक खताचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 01:02 PM2020-06-17T13:02:52+5:302020-06-17T13:05:13+5:30
लॉकडाऊनमध्ये सोलापूर जिल्ह्यात घुसवले बोगस खत; कोल्हापूरची टोळीचा करमाळा पोलिसांनी केला पर्दाफाश
राजकुमार सारोळे
सोलापूर : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेला सूट मिळाल्याचा फायदा उचलत मीठापासून तयार केलेल्या बोगस रासायनिक खताचा पुरवठा करणाºया कोल्हापूरच्या टोळीचा करमाळा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
बनावट रासायनिक खत तयार करणाºया टोळीचा म्होरक्या मोहन सुतार (रा. कागल, जि. कोल्हापूर) याला पोलिसांनी अटक करून कोल्हापुरातील खत तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे गोदाम व पिशव्याची छपाई करणारी मशीन जप्त केली आहे. या प्रकरणाचा आणखी तपास सुरू आहे. पण खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकºयांकडून होणाºया खताच्या खरेदीचा फायदा उचलत या टोळीने चक्क एका नामांकित कंपनीच्या नावाच्या पिशव्याची नक्कल करून छपाई केली.
करमाळा व माढा हे धरणाजवळचे तालुके निवडून या परिसरातील दुकानांना बोगस खताचा पुरवठा केला. पण या टोळीने ज्या कंपनीच्या नावे हे पोटॅश खत पुरविले त्या कंपनीने ९ महिन्यांपासून उत्पादन केलेले नव्हते. त्यामुळे पिशवीवरील तारखेवरून कृषी विभागाला संशय वाटल्याने तपास केल्यावर ही बाब समोर आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी या टोळीचा पर्दाफाश केला असून, आणखी धागेदोरे हाती येणार आहेत.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी कृषी विभागातर्फे बियाणे व खत पुरवठ्याची तयारी केली जाते. याप्रमाणे कृषी विभागाचे नियोजन सुरू असतानाच करमाळा तालुक्यात बोगस खत आल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. गुण नियंत्रण विभागाचे अधिकारी सागर बारवकर यांच्या मदतीने कृषी विभागाचे सहायक संचालक रवींद्र माने यांनी कृषी सहायकाच्या मदतीने परिसरात सापळा लावला. त्यावेळी एका शेतकºयाकडे झुआरीच्या पोटॅश खताच्या दोन गोण्या मिळाल्या. त्यातील खत तपासले असता, मीठ असल्याचे दिसून आले. त्या शेतकºयाने खत कोठून घेतले याची चौकशी करून दुकानदारांकडून खत पुरविणारा एजंट अक्षय काशीद याला विश्वासात घेतल्यावर ही बाब उघड झाली. गुन्हा दाखल झाल्यावर बोगस खताबाबत चर्चा झाल्यावर आता अनेक शेतकरी असे खत खरेदी केल्याबाबत पुढे आले आहेत.
कंपनीचे अधिकारी चक्रावले
- पोटॅश खतावर सरकार अनुदान देते. करमाळा भागात विक्री झालेल्या या खताला पावत्या दिल्या गेल्या नव्हत्या. दुकानदारांनीही असे खत घेता येत नाही. त्यांना झुआरीचे खत बंद आहे हे माहीत असतानाही जादा कमिशन मिळण्याच्या आशेपोटी ही खरेदी झाली. झुआरी कंपनीच्या अधिकाºयांना पिशवीची खातरजमा करण्यासाठी बोलाविल्यावर छपाई पाहून तेही चक्रावले. अखेर आॅनलाईनवर ओरिजनल कंपनीच्या पिशवीचे डिझाईन तपासल्यावर बनाव उघड झाला.
अहवाल आल्यावर फुटणार बिंग
- पिशवीतील खताचे नमुने घेऊन प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले आहेत अशी माहिती गुण नियंत्रण माहिती सागर बारवकर यांनी दिली. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यावर या टोळीने खत तयार करण्यासाठी काय काय वापरले हे स्पष्ट होणार आहे. पण सकृतदर्शनी ४० टक्के मीठ असल्याचे दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील दुकानात आढळलेले खत बोगस असल्याचे दिसून आले आहे.
शेतीचे होणार वाटोळे
- करमाळा, माढा परिसरात बागायती शेतकरी उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खत वापरावर भर देतात. रासायनिक खताच्या अतिवापराने शेतजमिनी क्षारपड होण्याचा धोका असल्याचे सांगितले जात असताना या टोळीने चक्क मीठापासून बनविलेले खत पुरवून शेतकºयांना संकटात टाकले आहे. या खताने पिकाचे तर वाटोळे झालेच याशिवाय सुपीक जमिनीला धोका निर्माण झाल्याची भीती अर्जुन गावडे या शेतकºयाने व्यक्त केली.