सुरेश पाटील विषबाधा प्रकरण ; जबाबासाठी नगरसेवकांचे ठाण्यात हेलपाटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 04:24 PM2018-11-21T16:24:53+5:302018-11-21T16:27:04+5:30
सोलापूर : नगरसेवक सुरेश पाटील यांनी विषबाधाप्रकरणी ज्यांची ज्यांची नावे घेतली होती त्यांचा जबाब घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. ...
सोलापूर : नगरसेवक सुरेश पाटील यांनी विषबाधाप्रकरणी ज्यांची ज्यांची नावे घेतली होती त्यांचा जबाब घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. मंगळवारीे काही नगरसेवकांनीही यासाठी पोलीस ठाण्यात हेलपाटे मारले. महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकांना पाणी पाजणारे शिपाईही यातून सुटले नाहीत.
थेलियम विषबाधा प्रकरणात सुरेश पाटील यांनी अनपेक्षित नावे घेतल्याने काँग्रेस, बसपा आणि राष्ट्रवादीतील मोर्चेकरी मित्रांचा भ्रमनिरास झाल्याची चर्चा महापालिकेत रंगली आहे. यातील एका मित्राने सुरेश पाटील यांच्या घरी जाऊन ‘काय अण्णा, करायला गेलो एक आणि तुम्ही दुसरंच करून ठेवलं’ असे बोलून दाखविले. तर दुसºयाने, मी आता अण्णाकडे जात नसतो, असे कळविल्याचेही मंगळवारी ऐकायला मिळाले.
विषबाधा प्रकरणातील दोषींवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी सुरेश पाटील मित्र परिवाराच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाच्या तयारीची बैठक सुरेश पाटलांच्या घरी व्हायची. मोर्चात कोणी काय बोलायचे, कोणावर जास्त टीका करायची नाही याचे मार्गदर्शन सुरेश पाटील करीत असल्याची चर्चा होती. ‘भाऊ आणि दादा’ त्यांना फोन लावून देण्याचे काम करायचे. पालकमंत्र्यांच्या विरोधात या सर्व घटना घडत असल्याचा भास यातून निर्माण होत होता. त्यामुळे पालकमंत्री गटही अस्वस्थ होता.
अखेर सुरेश पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन सहकारमंत्री गटातील नेत्यांवर संशय व्यक्त केला. यानंतर मित्र गटात अस्वस्थता पसरली. सायंकाळी एका मित्राने पाटलांचे घर गाठले. अण्णा हेच करायचे होते तर आम्हाला का गुंतवले. नावं घेण्यापूर्वी आम्हाला तर सांगायचे होते. काल-परवा तर दुसरंच बोलता होता. अण्णा तुम्ही हे बरोबर केलं नाही, असे सुनावले. दुसºया मित्राने तर अण्णांच्या घराकडे फिरकण्यास नकार दिला. पालकमंत्री गटातील प्रमुख नगरसेवकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. पण अण्णांनी पोलिसांकडे हे प्रकरण सोपवायला हवे होते. उगीच इतरांची नावे घेतली, अशी प्रतिक्रिया नाव न सांगण्याच्या अटीवर नोंदविली.
लक्ष्मीदर्शन कोणी घडविले ?
- - काल-परवा ठराविक नेत्यांचे नाव येत होते. पण दिवाळीत लक्ष्मीदर्शन झाल्यामुळेच सुरेश पाटील यांनी ठराविक नेत्यांचे नाव वगळून इतर लोकांची नावे घेतल्याचा आरोप महापौर शोभा बनशेट्टी यांचे पती श्रीशैल बनशेट्टी यांनी केला आहे. या आरोपानंतर अण्णांना नेमकं कोणत्या नेत्याने लक्ष्मीदर्शन घडविले याची चर्चाही महापालिकेत रंगली आहे. दरम्यान जबाबासाठी मुदत मिळावी, असे लेखी पत्र महापौर शोभा बनशेट्टी यांच्यातर्फे पोलिसांना देण्यात आले आहे.
सुरेश पाटील प्रकरणाचा चेंडू सरकारी वकिलांच्या कोर्टात
- सध्या गाजत असलेल्या नगरसेवक सुरेश पाटील यांच्या विषप्रयोगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी जोडभावी पेठ पोलिसांनी जिल्हा सरकारी वकिलांकडे मंगळवारी अभिप्राय मागवला आहे.
- - नरसेवक सुरेश पाटील यांच्या विषप्रयोगप्रकरणी सध्या पोलिसांनी जाबजबाबाला सुरूवात केली आहे. सुरेश पाटील यांच्या तक्रारीवरून महानगरपालिकेतील शिपाई, लिपिकापासून अन्य कर्मचारी व संशयितांना जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात बोलावले जात आहे. प्रत्येकाचा जबाब घेतला जात आहे. जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंह राजपूत यांच्या अभिप्रायानंतर संशयितांवर गुन्हे दाखल होणार आहेत.