सुरेशअण्णा जरा सबुरीनं घ्या... सोलापुरातील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 10:15 AM2018-11-22T10:15:58+5:302018-11-22T10:17:44+5:30
थेलियम विषबाधा प्रकरण : पोलिसांना त्यांचे काम करू द्या
सोलापूर : थेलियम विषबाधा प्रकरणानंतर शहर भाजपातील अस्वस्थता कायम आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने नगरसेवक सुरेश पाटील यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे. पोलीस त्यांचे काम करतील. तुम्ही जाहीरपणे काही बोलू नका, असेही पालकत्वाच्या नात्याने सांगितले आहे.
थेलियम विषबाधा प्रकरणात सुरेश पाटील यांनी महापौर शोभा बनशेट्टी, त्यांचे पती श्रीशैल बनशेट्टी, शिखर बँकेचे संचालक अविनाश महागावकर, भाजपाचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, नगरसेवक सुनील कामाटी यांची संशयित म्हणून नावे घेतली आहेत. या सर्वांना तत्काळ अटक न झाल्यास जोडभावी पेठ पोलीस ठाण्यासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
या प्रकरणानंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख गटातील नेते नाराज झाले आहेत तर पालकमंत्री विजयकुमार देशमुख गटातील नेते चार हात दूर राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. शहर भाजपातील वातावरण बिघडल्याची जाणीव दोन मंत्र्यांनाही झाली आहे. शहरातील काही नेत्यांनी हा विषय प्रदेश पातळीवरही पोहोचविल्याने यावरून घमासान होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे सुरेश पाटील यांनी पोलिसांकडे तगादा लावला आहे. उपोषणाचा इशाराही दिला आहे. यादरम्यान, एका ज्येष्ठ नेत्याने सुरेश पाटलांकडे मंगळवारी रात्री काही माणसं पाठविली. अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध तक्रार द्या म्हणत असताना लोकांची नावं घेतली.
आता पोलिसांना त्यांचे काम करू द्या. राजकारणात असे करून चालत नाही, असे सांगितल्याचे कळते. माझा जीव गेला असता तर तुम्ही काय केले असते, असा सवाल करून पाटलांनी या माणसांना परत पाठविल्याची चर्चा मनपाच्या वर्तुळात आहे.
मुलाला धमकी, पोलिसांकडे तक्रार
- आठ दिवसांपूर्वी मला धमकीचे दुसरे पत्र आले. मुलाच्या मोबाईलवर अर्वाच्य भाषेतील संदेश आला आहे. याप्रकरणी आम्ही पोलिसांकडे तक्रार करतोय. मी सबुरीनं घेत आलोय. माझा जीव गेला असता तर माझ्या घरच्या लोकांचे काय झाले असते, याचे उत्तर कुणाकडे आहे. प्रदेश पातळीवरूनही मला निरोप आलेला नाही. मी पोलिसांना सहकार्य करतोय.
- सुरेश पाटील, नगरसेवक.
कोठेंसह कर्मचाºयांनी नोंदविला जबाब
- विषबाधा प्रकरणात बुधवारी सकाळी विरोधी पक्षनेता महेश कोठे यांच्यासह पालिकेतील काही कर्मचाºयांनी जबाब नोंदविल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. आजारी पडण्यापूर्वी कोठे यांच्याकडे जेवण केल्याचा उल्लेख सुरेश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत केला आहे.