बार्शीत म्युकरमायसोसिसची शस्त्रक्रिया यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:20 AM2021-05-24T04:20:50+5:302021-05-24T04:20:50+5:30
बार्शी : आज जगभरात कोरोना विषाणूचा थैमान असताना अनेक डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी बाधित रुग्णांना जीवनदान देण्यासाठी धडपडत आहेत. ...
बार्शी : आज जगभरात कोरोना विषाणूचा थैमान असताना अनेक डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी बाधित रुग्णांना जीवनदान देण्यासाठी धडपडत आहेत. दरम्यान, म्युकरमायकॉसिस नावाचा नवा आजार पुढे आल्याने भीतीचे वातावरण आहे.
मात्र बार्शीसारख्या ग्रामीण भागात म्युकरमायकॉसिस या आजारावरती योग्य उपचार झाल्याने एक जीव वाचला आहे. ही शस्त्रक्रिया लीला नर्सिंग होमचे डॉ. तरंग शहा यांनी केली आहे. आजाराबाबत योग्य ते निदान सुविधा हॉस्पिटलचे डॉ. अजित आवाड यांनी केले आहे.
अंजनगाव (ता. बार्शी) येथील महावीर संभाजी गवळी (वय ४२) हा रुग्ण कोरोना उपचारासाठी बार्शीतील सुविधा हॉस्पिटलमध्ये दहा दिवसांपूर्वी दाखल झाला होता. उपचार सुरू असताना तो गाल दुखत असल्याचे सांगत होता. डॉ. अजित आवाड यांनी तपासणी केली असता सदर रुग्णामध्ये म्युकरमायकोसिस आजाराची लक्षणे आढळली. त्यांनी रुग्ण आणि नातेवाइकांना पुढील उपचारासाठी बार्शीच्या डॉ. तरंग शहा यांच्याकडे पाठविले. या वेळी डॉ. शहा यांनी सर्व तपासणी करून म्युकरमायकोसिसची यशस्वी शस्त्रक्रिया केली. सध्या त्या रुग्णावर डॉ. आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील उपचार सुरू आहेत. सध्या रुग्णाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
डॉ. आवाड यांनी मागील एक वर्ष मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात कोविड विभागाचे प्रमुख म्हणून काम केले आहे.