अहो आश्चर्यम्; लस देण्यासाठी गेले तर कुत्रा का पाळला म्हणून विचारणा...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 05:04 PM2020-05-20T17:04:29+5:302020-05-20T17:07:46+5:30
पंढरपूर तालुक्यातील खर्डीतील घटना; सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात औषधांची टंचाई
सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील बंडू पवार हे नातेवाईकास श्वानदंश लस देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्यावर डॉक्टरांनी यांनी त्यांना लस उपलब्ध नसल्याचे सांगण्याऐवजी विनापरवाना कुत्रे पाळल्याबद्दल गुन्हा दाखल करावा लागेल, असे सांगून परत पाठविल्याची घटना सोमवारी घडली़
‘कोरोना’ साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेंतर्गत जिल्ह्यात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांची टंचाई जाणवत आहे. औषधांच्या खरेदीची फाईल सहीसाठी लटकल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे स्थानिक डॉक्टरांचे म्हणणे आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत अकरा तालुक्यांत ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ४३१ उपकेंद्रांमार्फत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. पण गेल्या कित्येक दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्रात गरजेच्या असलेल्या औषधांची खरेदीच झालेली नाही. जिल्हा परिषदेच्या सेस फंडाच्या खरेदीला ग्रामविकास विभागाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवरही एक रुपयाची साहित्य खरेदी झालेली नाही. जिल्हा वार्षिक योजनेतून २ कोटी ५४ लाखांचा निधी आला आहे. पण या निधीतून घेण्यात येणाºया साहित्याची खरेदी फाईलीत अडकली आहे.
जिल्ह्यात दोन महिन्यांपासून श्वानदंश लसीचा तुटवडा आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिक लसीसाठी हेलपाटे मारीत आहेत. पण जिल्हा आरोग्य विभागाकडून औषधे व इंजेक्शन्स पुरवली जात नसल्याच्या तक्रारी डॉक्टरांनी केल्या आहेत. श्वानदंश व इतर औषधांसाठी काही ठिकाणी ग्रामपंचायतींकडून निधी घेण्यात आला आहे तर काही ठिकाणी डॉक्टरांना स्थानिक खर्चातून गरज भागविण्यास सांगण्यात आले आहे. एका डॉक्टरने तर औषधांसाठी अॅम्ब्युलन्स पाठवितो, पण त्यातून येणाºया औषधांच्या किमतीपेक्षा डिझेलचा खर्च जास्त होत असल्याचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे. फॉर्मासिस्ट सोळंकी यांना औषधांबाबत विचारणा केल्यावर साठा संपल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे.
श्वानदंश लसी यापूर्वी हाफकिन इन्स्टिट्यूटकडून मागविल्या होत्या. पाच हजार लसींचा पुरवठा झाला. आता नव्याने मागणी केली आहे. औषध खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे लवकरच हा प्रश्न मिटेल.
- डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा आरोग्य अधिकारी
औषधांसाठी सुरू आहे पाठपुरावा...
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरेसा औषध पुरवठा करावा, यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे आरोग्य सभापती दिलीप चव्हाण यांनी सांगितले. ‘त्या’ ६० लाखांच्या खरेदीशी आपला संबंध नाही. पण जिल्हा माता-बालसंगोपन अधिकारी डॉ. एस. पी. कुलकर्णी यांच्याकडील पदभार काढण्याच्या मागणीबाबत आपण आग्रही असून, मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांनी कोरोना साथीनंतर अंमलबजावणी करू, असे सांगितले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.