मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण सुरू, डाटा भरताना नेटवर्कचा प्रॉब्लेम
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: January 24, 2024 13:02 IST2024-01-24T13:02:37+5:302024-01-24T13:02:50+5:30
राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचनेप्रमाणे सोलापुरात ३१ जानेवारीपर्यंत मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे घरनिहाय सर्वेक्षण सुरू राहणार आहे.

मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण सुरू, डाटा भरताना नेटवर्कचा प्रॉब्लेम
सोलापूर : राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचनेप्रमाणे सोलापुरात ३१ जानेवारीपर्यंत मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे घरनिहाय सर्वेक्षण सुरू राहणार आहे. मंगळवारी, २३ जानेवारीपासून सर्व्हे सुरू झाला असून सर्व्हे दरम्यान पर्यवेक्षकांना नेटवर्कचा प्रॉब्लेम येत आहे. सर्व्हे डाटा ऑनलाइन भरताना डाटा लवकर अपलोड होईना. यामुळे, दिवसभरातून केवळ पाच ते सहा कुटुंबीयांचाच सर्व्हे होत आहे. याबाबत पर्यवेक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना विचारले असता नेटवर्कचा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आयटी विभाग काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक पर्यवेक्षकास १६ ते १७ कुटुंबीयांचे सर्व्हे करण्याचे उद्दिष्ट दिले असून, पुढील सहा दिवसांत पाच लाख घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी घरासमोर येणाऱ्या प्रगणक व पर्यवेक्षकांना माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूरकरांना केले आहे.
जिल्ह्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणासाठी प्रशासनाच्या वतीने ६ हजार ४७३ प्रगणक तर ४५८ पर्यवेक्षकांची नियुक्ती केलेली आहे. हे प्रत्येक गावात व प्रत्येक घरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. सर्वेक्षणात १८१ प्रश्नांचा समावेश आहे.