सुशीलकुमारांच्या ‘दगडू’ तर जयसिध्देश्वरांच्या ‘नुरंदय्या’ नावाला आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 01:52 PM2019-03-27T13:52:37+5:302019-03-27T13:54:45+5:30
जिल्हाधिकाºयांनी आक्षेप फेटाळत मंजूर केले अर्ज; अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड जाणार न्यायालयात
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘दगडू’ तर भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या ‘नुरंदय्या’ नावाला अपक्ष उमेदवारांनी आक्षेप घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हे आक्षेप फेटाळून लावत उमेदवारी अर्ज मंजूर केले.
सोलापूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेस आघाडीतर्फे दाखल केलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उमेदवारी अर्जाला अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी आक्षेप घेतला. सुशीलकुमार यांचे खरे नाव दगडू शंभू शिंदे हे आहे, पण उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी सुशीलकुमार संभाजीराव शिंदे असा उल्लेख केलेला आहे. त्यावर जिल्हाधिकाºयांनी नावात बदल केल्याबाबत सोबत गॅझेट जोडल्याचे सांगितले. त्यावर पुन्हा गायकवाड यांनी शिंदे यांच्या वयाबाबत आक्षेप घेतला. त्यांचे वय ७५ असताना ७९ नमूद केले आहे. तसेच मतदार यादीत सुशीलकुमार संभाजी शिंदे असे नाव असताना उमेदवारी अर्जावर वडिलांच्या नावात ‘राव’ जोडलेले आहे. मतदार यादीप्रमाणे नाव आहे़ वयाच्या अडचणीबाबत याक्षणी संबंध येत नाही, असा युक्तीवाद शिंदे यांचे वकील अमित आळंगे, प्रचारप्रमुख माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी केला़ हा युक्तीवाद मान्य करीत जिल्हाधिकाºयांनी आक्षेप फेटाळून लावला.
भाजपाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखला व नावाबाबत गायकवाड यांनी आक्षेप घेतला. जयसिद्धेश्वर यांचे मूळ नाव नुरंदय्या गुरूबसय्या हिरेमठ असे आहे, तसेच ते बेडा जंगम नसून हिंदू लिंगायत आहेत, असा दावा करीत पुराव्यादाखल शाळा सोडल्याचा दाखला सादर केला. त्यावर अॅड. संतोष न्हावकर यांनी नावातील बदल केलेले पुरावे व जातपडताळणीचे दाखले हजर केले. त्यावरून जिल्हाधिकाºयांनी गायकवाड यांचे आक्षेप फेटाळत उमेदवारी अर्ज मंजूर केला. याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. भाजपातर्फे कोणत्याही उमेदवाराबाबत आक्षेप घेण्यात आलेला नाही अशी माहिती जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी दिली.