पतंगराव कदमांनी चांगली साथ दिली - सुशिलकुमार शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2018 02:13 PM2018-03-10T14:13:13+5:302018-03-10T14:13:53+5:30
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पतंगराव कदम यांच्या आठवणींना उजाळा दिला.
सोलापूर - माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पतंगराव कदम यांच्या आठवणींना उजाळा दिला. पतंगराव कदम यांच्याशी माझा गेल्या काही वर्षापासूनचा सहवास आहे. काँग्रेसचे नेते नामदेवराव जगताप यांनी त्यांच्यासोबत माझी पहिली ओळख करून दिली होती. त्यानंतर दुसरी ओळख म्हणजे मी मुख्यमंत्री असताना ते राज्यमंत्री होते. १९८३ च्या नंतर त्यांनी व मी एकदम जवळून काम केलेले आहे. मी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष होतो ते उपाध्यक्ष होते. त्यांना मी सहकारी म्हणून अनेक ठिकाणी अडचणीच्या काळात निरनिराळ्या ठिकाणी पाठवत असे पतंगराव ते काम संपवून यशस्वी होऊन येत असत. राज्यात मंत्री म्हणूनही त्यांनी अगदी यशस्वी काम केलं. शेवटी मी मुख्यमंत्री असताना त्यांनी मला चांगली साथ दिली. ज्या ज्या वेळी अडचणी काळात सहकार्य करण्यासाठी ते माझ्याबरोबर सतत असत. त्यांचा स्वभाव सोज्वळ, मऊ होता पण शक्य तेथे कणखर भूमिका घेऊन काम पूर्ण करीत असत. पतंगराव कदम यांचे शैक्षणिक क्षेत्रातील काम ग्रेट म्हणावे लागेल. त्यांच्या निधन झाले आहे यावर माझा विश्वासच बसत नाही, अशी भावना सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली.
योद्धा हरपला
पतंगराव हे केवळ राजकारणी नव्हते तर ते महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात सकारात्मक हस्तक्षेप करून परिवर्तन घडवू पाहणारे एक योद्धा होते. एक सामान्य कुटुंबातील मुलगा ते भारती विद्यापीठाचे कुलपती ते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री असा त्यांचा प्रेरणादायी प्रवास होता. विधानसभेत आम्ही एकाच रांगेत बसायचो, त्यांच्या रिकाम्या जागेकडे बघून आम्हाला त्यांची सदैव आठवण येईल. - जयंत पाटील, आमदार, राष्ट्रवादी
पतंगराव कदम यांचा अल्पपरिचय
पतंगराव कदम यांचा जन्म 1945 रोजी सांगली जिल्ह्यातील सोंसल या गावी झाला. गावात शाळा नसल्या कारणाने पतंगरावांना 4 ते 5 किमी चालत जाऊन प्राथमिक शिक्षण घ्यावं लागत असे. पुढे पलूस तालुक्यातील कुंडल गावातून ते दहावी उत्तीर्ण झाले. दहावीनंतर त्यांनी साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. शिक्षण क्षेत्रातील सेवेची बिजं याच संस्थेत त्यांच्यामध्ये रुजली. 1961 साली ते पुण्यात आले आणि एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स करुन, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले. त्यावेळी पुणे विद्यापीठातून त्यांनी कायद्यात बॅचलर डिग्री मिळवली आणि पुढे पुणे विद्यापीठातून मास्टरचेही शिक्षण पूर्ण केले. 1964 साली वयाच्या 19 व्या वर्षी पुण्यात भारती विद्यापीठाची स्थापना केली.
असा होता राजकीय प्रवास
- जून 1991 -मे 1992 - शिक्षण राज्यमंत्री
- मे 1992 - 1995 - शिक्षणमंत्री (स्वतंत्र खाते)
- ऑक्टोबर 1999 ते ऑक्टोबर 2004 - उद्योग, व्यापार, वाणिज्य आणि संसदीय कामकाज खात्यांचे कॅबिनेट मंत्री
- नोव्हेंबर 2004 पासून पुढे - पुनर्वसन आणि मदतकार्ये या खात्यांचे मंत्री
- प्रभारी अध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
- डिसेंबर 2008 पासून - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन - महसूल, पुनर्वसन आणि मदतकार्ये, भूकंप पुनर्वसन आणि शालेय शिक्षण
- मार्च 2009 पासून - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन महसूल खाते
- नोव्हेंबर 2009 पासून पुढे - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन - वनविभाग
- 19 नोव्हेंबर 2010 ते 2014 - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य - वनविभाग, पुनर्वसन आणि मदतकार्ये, भूकंप पुनर्वसन