तीन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा, पालकमंत्री हटवा- प्रभाकर देशमुखांची मागणी
By काशिनाथ वाघमारे | Published: March 17, 2023 05:38 PM2023-03-17T17:38:22+5:302023-03-17T17:38:30+5:30
कल्याणशेट्टींना वगळून पालकमंत्री करा, आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा
काशिनाथ वाघमारे, सोलापूर: आपणावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. शेतकरी संघटनेच्या चळवळीला दाबण्यासाठी कट रचून गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी तीन पोलीस अधिका-यांना निलंबीत करुन त्यांची चौकशी करा, पालकमंत्र्यांना हटवा, सचिन कल्याणशेट्टी यांना वगळून जिल्ह्यातील भाजप सेनेच्या इतर आमदारांस पालकमंत्री करा अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी केली, अन्यथा आझाद मैदानावर आंदोलन करु असा इशारा पत्रकार परिषदेत दिला.
मागण्यांचे निवेदन घेऊन पालकमंत्र्यांना भेटायला निघालेल्या जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली सदर बझार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात त्यांची आणि कार्यकर्त्यांची जामीनावर मुक्तता झाली. त्यानंतर शुक्रवारी प्रभाकर देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत स्वत:ची बाजू मांडत अन्याय झाल्याचे म्हणाले. शेतकरी संघटनेचे निवेदन पालकमंत्री घेत नाहीत. ते पद, सत्तेचा गैरवापर करत आहेत. ते परजिल्ह्याचे आहेत. त्यांचा राजीनामा घेऊन हाकालपट्टी करावी, संबंधीत तीन पोलीस अधिका-यांना निलंबीत करुन चौकशी करावी, सचिन कल्याणशेट्टी यांना वगळून सोलापूर जिल्ह्यातील भाजप-सेनेच्या कोणत्याही आमदाराला पालकमंत्रीपद द्यावे, चार छावणीची प्रलंबीत बिले द्यावीत अशी मागणी केली.
आगामी विधानसभेत कल्याणशेट्टी आमदार नसतील
गुन्हे दाखल होण्यापूर्वी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पोलिसांना जनहितच्या कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यास सांगितल्याचा आरोप प्रभाकर देशमुख यांनी केला. ज्या शेतक-यांनी कल्याणशेट्टींना निवडूण दिले त्या आमदारांनी असे वागणे बरे नव्हे. अगामी विधानसभेत ते आमदार म्हणून दिसणार नाहीत, मी त्यांना आव्हान देतोय असेही देशमुख म्हणाले.