‘नीट’प्रकरणी संजय जाधववर अखेर निलंबनाची कारवाई; आणखी कोणाचा सहभाग, चौकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 08:43 AM2024-06-28T08:43:44+5:302024-06-28T08:44:07+5:30
न्यायालयाकडून २ जुलैपर्यंत सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावलेली आहे.
कुर्डूवाडी : ‘नीट’च्या घोटाळ्यात लातूर पोलिसांकडून अटक करण्यात आलेला टाकळी (टें.)(ता. माढा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा उपशिक्षक संजय तुकाराम जाधव याला अखेर गुरुवारी सायंकाळी जिल्हा परिषदेकडून निलंबित करण्यात आले. बुधवारी सायंकाळी लातूर पोलिसांकडून त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक केल्याचे पत्र जि. प. प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांना मिळाले. त्यानुसार गुरुवारी त्यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे अहवाल सादर केला, त्यानंतर ही कारवाई झाली.
गुरुवारी शिक्षण विभागाकडून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे नीट प्रकरणातील आरोपी उपशिक्षक जाधव याच्याविषयी अहवालासह फाइल कारवाईसाठी सादर करण्यात आली; परंतु राज्यात अधिवेशन सुरू असल्याने तो प्रश्न अधिवेशनात तारांकित होण्याची शक्यता असल्याने या संपूर्ण प्रकरणाबाबत सायंकाळी उशिरापर्यंत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून सुनावणी घेऊन शेवटी निलंबनाची कारवाई करण्यात आली.
अन् कारवाईची प्रक्रिया पूर्ण
नीट परीक्षेत विद्यार्थ्यांना गुण वाढवून देण्याचे आमिष देऊन पोलिसांच्या प्रथमदर्शनी १४ जणांकडून ॲडव्हान्सपोटी ५० हजार रुपयांची रक्कम स्वीकारल्याप्रकरणी लातूर पोलिसांत त्याच्यावर रविवारी सायंकाळी एटीएस पथकाकडून गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर मंगळवारी पोलिसांनी त्याला लागलीच ताब्यात घेऊन तेथील न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाकडून २ जुलैपर्यंत सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावलेली आहे. याबाबत लातूर पोलिसांनी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांना बुधवारी सायंकाळी पत्राद्वारे कळवले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.