निलंबन आडम मास्तरांच्या पथ्यावर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 05:07 AM2019-03-06T05:07:15+5:302019-03-06T05:07:25+5:30
पार्क स्टेडियमवर झालेल्या कार्यक्रमात सहभागी झाल्याप्रकरणी माकपचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार नरसय्या आडम यांच्यावर पक्षाने केंद्रीय समितीतून निलंबनाची कारवाई केली आहे.
सोलापूर : कम्युनिष्ट पक्षांनी पुकारलेल्या देशव्यापी संपात सहभागी न होता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार्क स्टेडियमवर झालेल्या कार्यक्रमात सहभागी झाल्याप्रकरणी माकपचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार नरसय्या आडम यांच्यावर पक्षाने केंद्रीय समितीतून निलंबनाची कारवाई केली आहे. माकपने ८ व ९ जानेवारी रोजी बेरोजगारांना रोजगार, शिक्षण, आदिवासींना जमीन आदी मागण्यांसाठी देशव्यापी संपाची हाक दिली होती़ माजी आमदार आडममास्तर हे माकपचे प्रदेश सचिव आहेत. त्यांनी ८ जानेवारी रोजी देशव्यापी संपात सहभाग नोंदविला, परंतु ९ जानेवारी रोजी माजी आमदार आडम मास्तर यांनी विडी व कष्टकरी समाजासाठी मंजूर करून आणलेल्या ३० हजार घरकुलांच्या प्रकल्पाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होता. त्यामुळे आंदोलन बाजूला ठेवून ते या कार्यक्रमात सहभागी झाले.
कामगारांची वसाहत, हेच निलंबनामागचे कारण
नरसय्या आडम यांनी कामगारांसाठी ३० हजार घरांचा रे नगर नावाचा प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प केंद्रातील भाजपा सरकारने मंजूर केला आहे. या प्रकल्पातील घरांसाठी अर्धी रक्कम केंद्र आणि राज्य सरकार देणार आहे. लोकसभेला काँग्रेसचा प्रचार केल्यास आडम यांचा हा प्रकल्प अडचणीत येऊ शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.