कुंभारीत विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; पालकांची पोलीस ठाण्यात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:15 AM2021-07-24T04:15:23+5:302021-07-24T04:15:23+5:30
कारवाईसाठी आई-वडिलांची अधीक्षकांकडे धाव लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकोट : कर्जाळ येथील एका २० वर्षीय विवाहितेचा कुंभारीत संशयास्पद मृत्यू झाला. ...
कारवाईसाठी आई-वडिलांची अधीक्षकांकडे धाव
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकोट : कर्जाळ येथील एका २० वर्षीय विवाहितेचा कुंभारीत संशयास्पद मृत्यू झाला. तिच्या मृत्यूप्रकरणी तक्रार देण्यासाठी नातवाइकांनी संबंधित पोलीस ठाण्याच्या चकरा मारल्या. या घटनेला महिनाभराचा कालावधी लोटला तरी याची दखल घेतली जात नसल्याने कंटाळून नातेवाइकांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तक्रार केली.
पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार जयश्री पंडित खंदारे (रा. कर्जाळ, ता. अक्कलकोट) यांचा तीन वर्षांपूर्वी (कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर) येथील रोहित मोरे यांच्याशी विवाह झाला होता. २५ मे रोजी दुपारी १२ वाजता अचानकपणे जावई रोहित यांनी सासरे पंडित खंदारे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. मुलीला घेऊन माहेरी सोडत असल्याचा निरोप दिला. सायंकाळ झाली तरी मुलीला घरी आणले नाही म्हणून पंडित यांनी कुंभारीत जाऊन चौकशी केली. तेथील लोकांमधून वेगवेगळी उत्तरे आली. यावरून संशय आल्याने त्यांनी वळसंग पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी जयश्रीच्या सासरच्या लोकांशी संपर्क साधला असता तिला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे सांगितले.
यानंतर आई-वडिलांनी जाऊन पाहिले असता जयश्रीच्या शरीरावर रक्ताचे डाग, खुणा दिसून आल्या. पाच दिवस उपचार सुरू होते. ३१ मे रोजी रात्री ८ वाजता रुग्णालयात मृत्यू झाला. मुलीचा खून झाल्याचा तिच्या आई-वडिलांचा संशय असून, त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यात सतत हेलपाटे मारले. अनेक कारणे सांगून त्यांना परत पाठवून दिल्याचा आरोप मयताचे वडील पंडित खंदारे यांनी केला आहे. त्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.
---
सासरच्या लोकांनी मारहाण केल्याचे उपचार घेत असताना दबक्या आवाजात मुलीने सांगितले आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नाही. दोन दिवसांपूर्वी लेखी तक्रार घेऊन पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेलो होतो. संबंधित पोलिसांना तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- पंडित खंदारे
जयश्रीचे वडील
---
मृत महिला मोटारसायकलवरून पडून जखमी झाली होती. याबाबतची माहिती स्थानिक व सासरच्या लोकांनी दिली आहे. तिच्यावर सोलापूर येथे उपचार सुरू होते. अखेर पाच दिवसांनी तिचा मृत्यू झाला आहे. शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहोत. त्यावरून पुढील कारवाई होईल.
- अतुल भोसले
सहायक पोलीस निरीक्षक, वळसंग पोलीस ठाणे