सर्व घटकांचा शाश्वत विकास हाच मुख्य ध्यास : जयसिध्देश्वर महास्वामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:00 PM2019-05-24T12:00:55+5:302019-05-24T12:03:13+5:30
विजयानंतर महास्वामींनी प्रथम ‘लोकमत’ शी साधला संवाद
सोलापूर : आपण सारे भारतीय आहोत. भारतीय हा एकच आमचा धर्म आहे. तो आपण सगळ्यांनी मिळून निभावू आणि देश बलशाली करू. मतदारसंघासह देशातील सर्व घटकांचा शाश्वत विकास हाच माझा ध्यास असल्याचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले भाजपचे विजयी उमेदवार शिवाचार्यरत्न डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी सांगितले.
प्रश्न : धर्मकारण गाजवून राजकारणात आलात. यात तुमची भूमिका काय असेल ?
उत्तर : धर्म आणि दंड वेगळे असू शकत नाहीत. धर्माला राजदंडाचा आधार आवश्यक आहे. या माध्यमातून धर्मदंड आणि राजदंड एकत्र आले आहेत. या माध्यमातून समाजाचा शाश्वत विकास साधण्याची माझी भूमिका राहील.
प्रश्न : विकासाचे मुद्दे काय असणार?
उत्तर : सध्या सगळ्यांना विकास अभिप्रेत आहे. मूलभूत सोयी-सुविधांबरोबरच सिंचन, जलसंधारण, आरोग्य, शिक्षणावर अधिक भर असणार आहे. शिवाय विद्यापीठाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणारे शिक्षण देण्याचे अभ्यासक्रम विकसित करून ते मूळ रूपात आणण्यावर भर असेल.
प्रश्न : धर्मदंड आणि राजदंड कसे सांभाळणार?
उत्तर : राजदंड हाती आल्यामुळे धर्मदंडाकडे दुर्लक्ष होणार नाही. संन्याशी वृत्तीची दिनचर्या आहे तशीच असणार आहे.