‘सुटलो’ बुवा एकदाचा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:11 PM2019-02-14T12:11:27+5:302019-02-14T12:12:17+5:30

‘मी बलात्कार नाही हो केला पत्रकारसाहेब ! केवढी बातमी छापलीय...खरं सांगा, तुम्हाला तरी वाटतोय का मी बलात्कार करणारा हैवान ...

'Sutleo' Buwa Once ...! | ‘सुटलो’ बुवा एकदाचा...!

‘सुटलो’ बुवा एकदाचा...!

Next

‘मी बलात्कार नाही हो केला पत्रकारसाहेब ! केवढी बातमी छापलीय...खरं सांगा, तुम्हाला तरी वाटतोय का मी बलात्कार करणारा हैवान असेल? ...किती बदनामी झालीय माझी...!’ धिप्पाड देहयष्टीचे हे जाधव किंचित संतापून तर बरंचसं खचून गेल्यासारखं बोलत होते.

सैन्यातून निवृत्त होऊन ते एका धार्मिक संस्थेत सुरक्षेच्या प्रमुख पदावर काम करीत होते. त्यांच्या शिस्तीचा बराच बोलबाला झाला होता. त्यामुळं त्यांचं नाव लोकांच्या कानापर्यंत केव्हाच पोहोचलेलं होतं. शिस्त म्हणजे शिस्त ! अगदी कडक ! सैन्यात मोठ्या हुद्यावर काम करून निवृत्त झालेला हा जवान...पन्नाशीच्या आसपासचं वय असेल; पण भक्कम उमेद अन् चेहºयावरचं तेज तरुणांचंच ! ते सारंच आज कोमेजलेलं होतं. हाताखालच्या एका महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला होता. बलात्कार हा तर अमानवीच; पण बलात्काराचे अथवा विनयभंगाचे सगळेच आरोप हे खरेच असतात का हो? या दुनियादारीत काय चालतं हे सगळ्यांना माहीत असलं तरी बोलायला कुणी तयार होत नाही ना ! असे आरोप कुणाचं जगणं हिसकावून घेतात तर कुणी नाव कमविण्यासाठी आयुष्यभर केलेलं अपार कष्ट मातीमोल करतात हे सुद्धा वास्तव नाही काय?

सैन्यातली शिस्त त्यांनी आपल्या दुसºया नोकरीतही राबवली होती. कुणाची मनमानी चालू देत नव्हते की, कुणाला भीकही घालत नव्हते. त्यांच्या शिस्तीने दुखावलेल्यांची संख्या वाढतच राहिली होती. साहजिकच अनेकांच्या डोळ्यावर ते आले होते आणि त्यांच्याविरुद्ध कटकारस्थान करण्याचे नियोजन अनेकजण सतत करीत राहिले...अन् एकेदिवशी मध्यरात्री पोलिसांच्या छाप्यात (की कारस्थानाच्या ‘जाळ्यात?’) ते ‘सापडले!’ हाताखाली काम करत असलेली कर्मचारी महिला रात्रीच्या ‘मुक्कामाला’ त्यांच्यासोबत होती. दोघांनाही रात्रीच पोलीस ठाण्यात आणलं...सकाळ झाली पण तसेच बसून ! ती महिला विचारायची, ‘साहेब, आमचं प्रेम आहे हा गुन्हा आहे काय ?’ दोघेही कायद्यानं सज्ञान. तक्रार तर कुणाचीच नाही, गुन्हा दाखल करायचा तर तो कसला ? अखेर दिलं सोडून...त्यांना सोडून दिल्यानं भरदिवसा अनेकांच्या झोपा उडाल्या...हातात आलेली ‘शिकार’ अशी कशी सोडायची ? गिधाडं वळचणीला टपूनच बसलेली असतात, टोच्या मारायला आतूर झालेली असतात.

अस्वस्थ कारस्थानी पुन्हा सक्रिय झाले...साम, दाम, दंड, भेद...सगळ्यांचा वापर झाला अन् आमचं प्रेम आहे म्हणणारी ‘ती’ पुन्हा पोलीस ठाण्यात हजर झाली...‘साहेब, माझ्यावर बलात्कार झालाय...माझी मेडिकल तपासणी करा’ पोलीस नक्की गालात हसले असतीलच ! पुढचे सोपस्कार पार पडले, गुन्हा दाखल झाला. या जवानाला अटक झाली. वर्तमानपत्रात मोठ-मोठ्या बातम्या झळकल्या अन् सर्वसामान्यांच्या चर्चेतही हाच विषय रेंगाळला...‘एवढ्या शिस्तीचा माणूस अन् हाताखालच्या कर्मचारी महिलेवर बलात्कार? बापरे !’ खलनायक मात्र खुशीत होते. ‘लय रूबाब करीत होता काय? आम्हाला आडवं येतो ! आता भोग म्हणावं...’

कायम ताठ मानेनं जगणाºया या जवानाची मानच काय, आता खांदेही झुकलेले होते. त्यांच्या नजरेतला जळजळीत कटाक्ष पुरता विझून गेला होता...नजर समोरच्याच्या नजरेचा सामना करण्यास धजावत नव्हती. सहज जरी कुणी त्यांच्याकडं पाहिलं तरी त्या नजरा त्यांचं मन रक्तबंबाळ करीत होत्या. ‘मी बलात्कारी नाही होऽ!’ असंच त्यांना ओरडून सांगायचं असावं; पण...समाज नेमका कसा असतो हेच ते अनुभव होते. अधूनमधून ओघळणारे त्यांचे मुके अश्रू बरंच काही बोलून जात होते...पण ऐकणारं नव्हतं ना कोणी...!

खटला चालला...सगळ्या बाजू समोर आल्या. खलनायकी डाव फसला अन् ते निर्दोष ठरले. न्याय मिळाला होता; पण त्यांच्या चेहºयावर त्याचा अपेक्षित आनंद दिसत नव्हता. झुकलेल्या त्यांच्या खांद्यांना उभारी आलीच नाही अन् डोळ्यातला अपराधी भाव किंचितही कमी नव्हता. ते म्हणाले, ‘मी अपराधी नव्हतोच...या कोर्टात सुटणारच होतो...आमचा ‘सौदा’ अनैतिक असला तरी खुशीचा होता. ‘वरच्या’ कोर्टात तर मला बोलावणंच येणार नाही; पण माझ्या कुटुंबाच्या कोर्टात मी निर्दोष होईन का? त्यांना कसं पटवून देऊ की, मी खरंच बलात्कार केला नाही म्हणून!’ त्यांना चिंता होती घरच्या न्यायालयाची. काही दिवस गेले अन् एकेदिवशी समजलं ‘या जवानानं राहत्या घरीच आत्महत्या केली!’ सगळ्यांच्या ‘नजरा’ पासून त्यांनी करून घेतलेली ही त्यांच्यासाठी होती खरी ‘सुटका!’ चितेवर जळतानाही त्यांना वाटलं असेल, ‘सुटलो बुवा एकदाचा!’
- अशोक गोडगे-कदम
(लेखक हे साहित्यिक आहेत.)

Web Title: 'Sutleo' Buwa Once ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.