‘स्वाभिमान’ निवडणूक रिंगणात असेल, पण कुठे अन् किती जागा हे नंतरच कळेल : नारायण राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 02:32 PM2019-02-23T14:32:22+5:302019-02-23T14:33:38+5:30
पंढरपूर : स्वाभिमान पक्ष आगामी निवडणूक लढविणार आहे़ मात्र किती जागा आणि कोणत्या ठिकाणच्या जागा हे नंतरच कळेल, असे ...
पंढरपूर : स्वाभिमान पक्ष आगामी निवडणूक लढविणार आहे़ मात्र किती जागा आणि कोणत्या ठिकाणच्या जागा हे नंतरच कळेल, असे सांगून खा़ नारायण राणे यांनी उत्सुकता कायम ठेवली आहे.
सहकार शिरोमणी वसंतराव काळे यांच्या अमृतमहोत्सवी जयंतीनिमित्त वाडीकुरोली येथे आयोजित पुरस्कार वितरण व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आ़ भारत भालके, संयोजक सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, नीलम राणे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत, राजूबापू पाटील, माजी आ़ शहाजीबापू पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, पंढरपूर तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल, स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगदीश बाबर, नगरसेवक चेतन नरोटे, संतोष पाटील, प्रतिभादेवी पतसंस्थेचे उपाध्यक्ष शहाजी साळुंखे, विठ्ठलचे संचालक महादेव देठे, कॉँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष नागेश फाटे, नारायण मोरे, सुरेश देठे आदी उपस्थित होते.
नारायण राणे म्हणाले, मी मुख्यमंत्री झालो, विविध खात्यांचे मंत्री होतो. लोकांची अहोरात्र कामे केली़ कोकणातून सहा वेळा निवडून आलो़ सातव्या वेळी पुन्हा निवडून येणार असे वाटत होते, मात्र पराभूत झालो. सुशीलकुमार शिंदे हे देखील राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनीही विविध खात्यांचे मंत्रीपद भूषविले़ इतकेच नाही तर केंद्रातही ऊर्जामंत्री, गृहमंत्री अशा महत्त्वाच्या पदांवर काम केले़ जनतेची कामे करूनही आम्हाला पराभूत का व्हावं लागतं हो ? असा सवाल करीत नेत्यांनीही जनतेचा विश्वास संपादन केला पाहिजे आणि जनतेने नेत्यावर विश्वास ठेवला पाहिजे, असे खा. नारायण राणे यांनी सांगितले.
शेतकरी हा देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे़ त्यांना सुखी ठेवणे हे सरकारचे काम आहे, मग ते कोणत्याही पक्षाचे असो़ परंतु नेत्यांच्या आश्वासनाने आणि घोषणेने त्यांचे पोट भरत नाही तर कृती केली पाहिजे़ शेतकरी विकासाचा घटक आहे, मात्र त्यांना सध्या दुष्काळात हालअपेष्टा करायला लावणे चुकीचे आहे़ सरकारने चारा छावणी सुरू करण्यासाठी कोणत्याही नियम व अटीचे बंधन घालू नये़ जनावरांना चारा द्यायचाच असेल तर उदार मनाने द्यावे, असा सल्ला नारायण राणे यांनी सरकारला दिला.