ऊसदर आंदोलनासाठी स्वाभिमानी रस्त्यावर; टायर पेटवून ऊस वाहतूक रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 04:38 PM2020-11-24T16:38:34+5:302020-11-24T16:39:09+5:30
ऊसदर आंदोलन चिघळण्यास सुरूवात; दुष्काळ, पूरपरिस्थिती, अतिवृष्टीमुळे सर्वसामान्य शेतकरी अडचणीत
पंढरपूर : कोल्हापूर येथे झालेल्या ऊस परिषदेत यावर्षी उसाला एकरकमी एफआरपी व १४ टक्के वाढ मिळावी, यासाठी कारखानदारांनी हमी द्यावी अन् कारखाने सुरू करावेत, अशी घोषणा स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी करूनही सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी १७०० रूपयांप्रमाणे उसाचा पहिला हप्ता काढला आहे. याचा निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी रात्री युटोपियन साखर कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक करणारी वाहने अडवून, टायर पेटवून निषेध केला. त्यामुळे ऊसदर आंदोलन चिघळण्यास सुरूवात झाली आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या आजूबाजूला असणाऱ्या जिल्ह्यातील सर्रास साखर कारखान्यांनी तीन हजार रूपयांच्या आसपास उसाची एफआरपी जाहीर केली असताना सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारच शेतकऱ्यांवर अन्याय करून चेष्टा करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.
अगोदरच दुष्काळ, पूरपरिस्थिती, अतिवृष्टीमुळे सर्वसामान्य शेतकरी अडचणीत आहे. यावर्षी किमान जाणाऱ्या उसाला एकरकमी एफआरपी व १४ टक्के वाढ देऊन साखर कारखानदार, सरकार शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढण्यास मदत करेल, अशी अपेक्षा असताना सोलापूर जिल्ह्यात युटोपियन साखर कारखान्याने सर्वात अगोदर १७०० रूपयांप्रमाणे पहिला हप्ता जाहीर केला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी व संघटनांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी प्रत्येकवर्षी कै. माजी आ. सुधाकरपंत परिचारक यांनी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून उसाचा पहिला हप्ता जाहीर करून उसदराची कोंडी फोडण्याचे काम केले होते; मात्र त्यांच्यानंतर त्यांच्याच विचाराने चालणाऱ्या साखर कारखान्याने १७०० रूपये पहिला हप्ता जाहीर केल्याने इतर कारखाने त्यापेक्षा वेगळी भूमिका घेणार नाहीत, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे युटोपियनने पुढाकार घेऊन वाढीव हप्ता जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानीने केली आहे.
वाहने अडविली, टायर पेटवून केला निषेध
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी रात्री ओझेवाडी, सातारा नाला, सोनके, बाजीराव विहीर येथे विविध साखर कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक वाहने अडविली. काही ठिकाणच्या मार्गावर टायर पेटवून जिल्ह्यातील साखर कारखानदारांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. आता ऊस गाळप हंगाम हळूहळू सुरू होत असताना स्वाभिमानीने उगारलेल्या ऊसदर आंदोलनामुळे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर मालक व कारखानदार, संघटना यांच्यामध्ये संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. दरवाढ मिळेपर्यंत स्वाभिमानी संघटना आंदोलनावर ठाम आहे.
यापूर्वीही वेळोवेळी आम्ही जिल्ह्यातील साखर कारखानदारांना एकरकमी एफआरपी व १४ टक्के दरवाढीची विनंती केली होती. मात्र प्रत्येकवेळी आम्हाला आश्वासनावर थांबविण्यात आले. मात्र ती आश्वासने कारखानदारांनी पाळली नाहीत. किमान २५०० रूपये पहिला हप्ता मिळावा, १४ टक्के दरवाढ मिळावी, अन्यथा स्वाभिमानी आणखी आक्रमक होऊन आंदोलन करेल. यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे.
- सचिन पाटील, तालुकाध्यक्ष (स्वाभिमानी शेतकरी संघटना)