लेखी आश्वासनानंतर स्वाभिमानीचे आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:20 AM2020-12-24T04:20:34+5:302020-12-24T04:20:34+5:30
१६ डिसेंबरपासून एफआरपीची रक्कम व मागील ७४ रुपयांच्या बिलाच्या मागणीसाठी श्रीसंत दामाजी कारखाना गेटसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने धरणे आंदोलन ...
१६ डिसेंबरपासून एफआरपीची रक्कम व मागील ७४ रुपयांच्या बिलाच्या मागणीसाठी श्रीसंत दामाजी कारखाना गेटसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने धरणे आंदोलन सुरू केले होते. दरम्यान २० डिसेंबर रोजी अज्ञात दोन इसमांनी तलवारींचा धाक दाखवून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे २१ डिसेंबर रोजी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दामाजी साखर कारखान्याच्या गव्हाणीत उड्या टाकून तब्बल चार तास कारखाना बंद पाडला.
स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांची आक्रमक भूमिका पाहून सुरक्षा अधिकारी बेदरे यांनी कार्यकारी संचालक व कारखान्याचे अध्यक्ष यांच्याशी फोनवरून संपर्क करून चर्चा घडवून आणली, मात्र चर्चा निष्फळ ठरली. यानंतर पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेत साखर संचालकांना यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी साखर संचालकांनी कारवाईचे पत्र दामाजी कारखाना प्रशासनाला दिल्यानंतर कारखाना प्रशासनाने तत्काळ बैठक बोलावून एफआरपीची रक्कम व मागील ७४ रुपयांचे बिल अदा करण्याचे लेखी आश्वासन दिले. यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन स्थगित केल्याचे सांगितले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल घुले, दत्तात्रय गणपाटील, जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, युवक जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, संतोष बिराजदार, श्रीमंत केदार, शंकर संगशेट्टी, आबा खांडेकर, राजीव रणे, रोहित भोसले, विजय पाटील, सचिन पाटील, बाहुबली साळवे, रणजित बागल, अनिल बिराजदार आदी उपस्थित होते.