सोलापूर झेडपीचे सीईओ स्वामी मोहोळ पंचायत समितीत पोचले अन् आश्चर्याचा धक्का बसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 12:35 PM2020-11-26T12:35:45+5:302020-11-26T12:35:48+5:30
कार्यालयातून सर्व कर्मचारी होते गायब; कामाबाबत परिपत्रक काढून नाही पडला फरक
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी गुरुवारी अचानकपणे मोहोळ पंचायत समितीच्या कार्यालयास भेट दिली आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण कार्यालयातून गायब होते सर्वच कर्मचारी.
झाले असे कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी सायंकाळी पंढरपूर दौऱ्यावर आले होते. सायंकाळी आढावा बैठक होणार म्हणून महसूल व जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी पंढरपुरला रवाना झाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी पहाटे श्री विठ्ठलाची महापूजा झाली. ते रवाना झाल्यानंतर सर्व अधिकारी सोलापुरातील मुख्यालयाकडे परत निघाले. येता येताच स्वामी यांनी आपली गाडी मोहोळ पंचायत समितीकडे फिरवली.
दरम्यान, कार्यालय सुरू होण्याची वेळ उलटून अर्धा तास झाला तरीही कार्यालयातील सर्व खुर्च्या रिकामे असल्याचे त्यांना दिसून आले. कर्मचाऱ्यांच्या या शिस्ती बद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. पंचायत समिती कार्यालयात सीईओ आल्याची माहिती मिळताच अधिकारी धावतपळत आले. लेटकमर बाबत दखल घेण्याची सूचना देऊन स्वामी सोलापूरला रवाना झाले. सीईओंच्या अचानक भेटीने कर्मचारी गांगरून गेले. आता लेटकमर कर्मचाऱ्यांचे काय होणार? याबाबत जिल्हा परिषद वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.