सोलापुरात स्विपिंग मशीन रस्त्यावर; राेज रात्री हाेणार १२० किमी मार्गावर स्वच्छता
By Solapurhyperlocal | Published: April 8, 2022 03:37 PM2022-04-08T15:37:01+5:302022-04-08T15:37:08+5:30
कामाला सुरुवात : फूटपाथवरील कचराही उचलणार
साेलापूर : शहरातील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करण्यासाठी आलेली वाहने गुरुवारी अखेर रस्त्यावर कार्यरत झाली. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन करण्यात आले. या मशीन राेज रात्री १० नंतर १२० किमी मुख्य रस्त्यांची स्वच्छता करणार आहेत.
महापालिकेने नवी दिल्ली येथील कंपनीला या कामाचा मक्ता दिला आहे. यासाठी प्रति रनिंग किलाेमीटर १,१५५ रुपये दर आकारण्यात आला आहे. हाेम मैदानाजवळील स्मार्ट राेडवर आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखविला.
यावेळी मुख्य सफाई अधीक्षक अनिल चराटे, सफाई अधीक्षक एन.सी. बिराजदार, अन्वर शेख, आय.टी. बिराजदार, स्वप्नील साेनलकर, गिरीश तंबाके, तेजस शहा आदी उपस्थित हाेते. उद्घाटन कार्यक्रमानंतर मशीनव्दारे हाेम मैदान ते रंगभवन या रस्त्याच्या स्वच्छतेचे काम करण्यात आले. यानंतर रात्री इतर रस्त्यांचे काम करू असे सांगण्यात आले. सध्या तीन मशीन, दाेन जेटींग मशीन आहेत. रस्त्यांची स्वच्छता केल्यानंतर फूटपाथची स्वच्छता हाेणार आहे. या कामावर पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग नियंत्रण ठेवणार असून दैनंदिन अहवाल घेण्यात येईल, असे उपायुक्त पांडे यांनी सांगितले.
--
असे कमी हाेतील धुळीचे थर
शहरातील रस्त्यांची अत्याधुनिक मशीनच्या साहाय्याने स्वच्छता झाल्यामुळे धूलीकणांचे प्रमाण कमी हाेईल. यातून प्रदूषणाची पातळी कमी करण्याचा प्रयत्न आहे. राेड स्विपिंग मशीनची स्वच्छतेची पहिली फेरी झाल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी किती प्रमाणात धूळ स्वच्छ झाली याची माहिती दिली. एका रस्त्यावरील धुळीचे थर कमी करण्यासाठी कमीत कमी १५ दिवस लागतील. टप्प्याटप्प्याने रस्ते धूळमुक्त हाेतील.
- धनराज पांडे, उपायुक्त, मनपा.
--
नागरिकांमधून स्वागत आणि सल्लेही
पालिकेने यापूर्वी रस्ते सफाईसाठी घेतलेली मशीन भंगारात निघाली. त्यामुळे नव्या मशीनबद्दल लाेकांना काैतुक नव्हते. गुरुवारी नव्या कामाचे व्हिडिओ साेशल मीडियावर अपलाेड झाले. त्यावेळी लाेकांनी स्वागत केले. शहरात नवे काहीतरी हाेतेय याचे स्वागत करू. पण, कामात सातत्य राहावे. मागील मशीन भंगारात काढल्या तसे काही हाेऊ नये असे सल्ले देण्यात आले.
---