सांगोला, वैराग, बार्शी येथील सीताफळांचा सोलापूरकरांना गोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 02:16 PM2020-10-02T14:16:30+5:302020-10-02T14:19:53+5:30
पाव किलोच्या फळाला मागणी : आवक वाढल्याने दर मात्र कमी
सोलापूर : सीताफळांचा हंगाम बहरला असून, फळबाजारात मोठ्या प्रमाणात सीताफळांची आवक पाहायला मिळत आहे. आवक वाढल्याने दरात देखील घसरण झाली आहे. या सीताफळांमध्ये मोठ्या आकाराची सीताफळे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. हे एक सीताफळ २५० ग्रॅम वजनाचे आहे. त्यामुळे एक किलोमध्ये केवळ तीन ते चार सीताफळं मिळत आहेत.
पावसाळ्यापासून सुरू होणारा सीताफळांचा हंगाम आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये संपतो. शेवटच्या काळात सीताफळांचा हंगाम मोठ्या प्रमाणात बहरतो. त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात सीताफळ पाहायला मिळतात. आताही बाजारात मोठ्या प्रमाणात सीताफळं येत आहेत. सीताफळांची आवक बहुतांश सांगोला, वैराग, बार्शी, मंगळवेढा या स्थानिक भागातून होत आहे. लहानापासून मोठ्या आकाराच्या सीताफळांचा यात समावेश आहे.
समाधानकारक पावसामुळे जास्त उत्पादित झालेल्या सीताफळांच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्यामुळे दर खाली आल्याने सीताफळप्रेमींना मोठ्या प्रमाणात सीताफळं खाता येणार आहेत. या वर्षीच्या समाधानकारक पावसामुळे फळे मोठी असून, गेल्या वर्षी एका क्रेटला १००० ते २००० रुपये दर होता. यावर्षी ५० टक्के कमी म्हणजे क्रेटला ५०० ते १००० रुपये दर मिळत असल्याचे शेतकºयांनी सांगितले़
उत्तम पावसाचा परिणाम...
सीताफळाच्या एका क्रेटला ५०० ते १००० रुपये दर आहे. गतवर्षी हा दर १००० रूपये ते २००० रूपये क्रेट इतका होता. मध्यम आकाराची सीताफळं ५० ते ६० रुपये किलो आहेत. यावर्षी बाजारात मोठ्या प्रमाणात सीताफळांची आवक होत आहे. चांगल्या पावसामुळे सीताफळं आकाराने मोठी आहेत, नागरिक देखील तेवढ्याच आवडीने खरेदी करत आहेत, अशी माहिती घाऊक व्यापारी अब्दुल रेहमान जमादार यांनी दिली.