ग्रामपंचायत निवडणुकीत गडबड करणाऱ्यांविरोधात तडीपारीचे प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:10 AM2021-01-08T05:10:38+5:302021-01-08T05:10:38+5:30
टेंभुर्णी : टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३४ गावांमध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया चालू आहे. यातील दोन गावांची निवडणूक बिनविरोध ...
टेंभुर्णी : टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३४ गावांमध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया चालू आहे. यातील दोन गावांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. चार गावे अतिसंवेदनशील, तर चार गावे संवेदनशील आहेत. निवडणुकीत गडबड करणाऱ्यांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली असून, अशा लोकांवर तडीपारीचे प्रस्ताव पाठविणार असल्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितले.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद झाली. केंद्रे म्हणाले, निवडणूक प्रक्रिया चालू असलेल्या प्रत्येक गावातील उमेदवार व कार्यकर्त्यांनी आचारसंहितेचे पालन करावे. निर्भय वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कोणीही वागू नये. गडबड करणाऱ्या लोकांवर पोलिसांची करडी नजर असून, कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास अशा लोकांवर तडीपारीचे प्रस्ताव पाठविले जातील. त्याचा परिणाम म्हणून अशा लोकांना येथून पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये १५ दिवसांसाठी जेलमध्ये बसावे लागेल. आतापर्यंत ५५ लोकांविरुद्ध तडीपारीचे प्रस्ताव पाठविले असल्याचेही केंद्रे यांनी सांगितले.
--
निमगाव (टें) व फुटजळगाव येथे बिनविरोध निवडणूक झाली आहे. गारअकोले, बेंबळे, तांबवे व सापटणे ही गावे हे अतिसंवेदनशील आहेत, तर नगोर्ली, मोडनिंब, दहिवली व उपळवाटे ही गावे संवेदनशील आहेत. या सर्व गावच्या निवडणुकीवर पोलिसांचे विशेष लक्ष आहे.
- राजकुमार केंद्रे
पोलीस निरीक्षक, टेंभुर्णी.