ताई.. तुम्ही लय भारीऽऽ बोलता !
By सचिन जवळकोटे | Published: October 29, 2018 08:19 AM2018-10-29T08:19:41+5:302018-10-29T08:41:31+5:30
...पण पप्पांना बिनकामाचं कामाला लावता...
लगाव बत्ती...
सचिन जवळकोटे
व्हयं ताईऽऽ... मग ताईऽऽ... कसं ताईऽऽ... पण कायपण म्हणा ताईऽऽ तुम्ही लय भारीऽऽ बोलता...बोलताव ते बोलताव...अन् वर पुन्हा पप्पांनाही बिनकामाचं कामाला लावताव. सोलापुरात आयुष्यभर पप्पांनी बेरजेचं राजकारण केलं...पण तुम्ही डायरेक्ट वजाबाकीचीच भाषा करताव. असं कसं हो ताईऽऽ
राजकारणाचा ‘मध्य’ साधण्यात पप्पा खूप हुशार; पण तुम्ही तर थेट मतदारसंघच ‘मध्य’ निवडलात. मास्तरांची जुनी परंपरा मोडीत काढून सोलापूरकरांनीही तुमच्यावर विश्वास टाकला. खरंतर, तो विश्वास केवळ तुमच्यावर नव्हता, तर शिंदे घराण्याच्या आजपर्यंतच्या योगदानावर होता. नंतर-नंतर तुम्ही स्वत:च्या कौशल्यानं मतदारांना जिंकत गेलात. तुम्ही जे-जे बोलत गेलात, ते करून दाखवत गेलात. तुमचा आत्मविश्वासही वाढत गेला. हे पाहून सारीच मंडळी म्हणू लागली...ताई, तुम्ही लय भारीऽऽ बोलता.. पण इथंच सारी गोची झाली. गणितं बिघडत गेली.
आता वकील खासदारांच्या ‘पर्सनल लाईफ’बद्दलही तुम्ही बिनधास्त बोललात. पक्षाच्या कार्यक्रमात आजूबाजूला मीडियावाल्यांचा कॅमेरा नाही, याची खात्री करूनच तुम्ही म्हणे लय भारीऽऽ बोललात; पण तुमच्याच एका कार्यकर्त्यानं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून क्लिप परस्पर फिरविली. कधी-कधी गल्लीबोळातल्या नवख्या कार्यकर्त्यांची असली आततायी निष्ठाही त्रासदायक ठरते बघा ताईऽऽ
खरंतर, नेत्यांनी एकमेकांच्या खाजगी जीवनाबद्दल कधीच बोलू नये... कारण साºयांचीच घरं काचेची. इथं कोण धुतल्या तांदळासारखं? तरीही तुम्ही बोललात. खासदारांच्या ‘पर्सनल मॅटर’बद्दल बोलण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असं लोक म्हणे खासगीत कुजबुजले. कुणी मध्यरात्री उशिरापर्यंत ढोसू दे, नाहीतर दुपारी बारापर्यंत डोळे मिटूू दे. ताई कशाला वाईट झाल्या, असंही ‘कमळ’वालेच खुसखुसले. पण जाऊ द्या ताईऽऽ तुम्ही जगाकडं लक्ष देऊ नका...लोक काय उचलली जीभ टाळ्याला लावतात. नस्ता वाद उकरून काढतात. तुम्ही आपलं छानपैकी बोलत राहा...कारण ताई, तुम्ही लय भारीऽऽ बोलता.
ताई... तुमच्या बोलण्यामुळं अनेक चांगली माणसं ‘जन-वात्सल्य’सोबत जोडली गेली; पण ‘जाई-जुई’च्या वेळची अनेक मंडळीही म्हणे तुटली. ती किती फायद्याची, यापेक्षा किती तोट्याची होती, याचाही हिशेब ‘कोठे’ तरी घेतला गेला. या नव्या समीकरणाचा फटका एकेकाळच्या कुबेरांनाही बसला. खरटमलांचाही ‘धीर’ सुटला. आता ते महेशअण्णांच्या सोबतीनं लोकसभेला ‘धनुष्य’ ताणणार. त्यांना म्हणे युद्धातल्या विजयापेक्षा ‘अपमानाचा सूड’ अधिक महत्त्वाचा. उज्ज्वलातार्इंच्या निवडणुकीत किरकोळ वाटलेल्या ‘नागमणीं’चा फटका आजही विसरला नसाल तर दुखावलेल्या-डिवचलेल्या अनेक नागांच्या गराड्यातही ताई, तुम्ही लय भारीऽऽ बोलता...पण एवढं विसरू नका... बोलण्याच्या नादात पप्पांना मात्र बिनकामाचं कामाला लावता !
आबांचे संस्कार...
...मोतीरामांची निष्ठा !
अखेर आम्ही पामरांनी जे गृहीत धरलं होतं, तेच घडलं. सातन दुधनीच्या मोतीरामानं दीपकआबांना ‘क्लिन चिट’ दिली. पक्षातल्या माता-भगिनींना थेट माता-भगिनीवरून शिव्या देणारे हे आबा नव्हतेच, असं चित्र निर्माण झालं. आबांसारख्या पापभिरू अन् सुसंस्कारीत नेत्याची जीभ अशी घसरणं शक्यच नव्हतं. पण काहीही म्हणा... त्या ‘आॅडिओ क्लिप’मध्ये घाणेरड्या शिव्या देणारा आवाज ज्या कोणाचा असेल, त्या महाभागावर एवढे उच्च संस्कार (!) करणाºया मात्या-पित्याला मात्र तमाम सोलापूरकरांंतर्फे मनापासून सलाम.
असो. दीपकआबा माढा लोकसभेसाठी चांगलेच तयारीला लागलेत...म्हणूनच नेहमी ‘एसी’त बसणारे आबा रात्रभर कुडकुडत कालव्यावर थांबले. सोबतीला गणपतआबाही होतेच. कानाला मफलर लावल्यामुळं गणपतआबांना काही शब्द ऐकू येत नव्हतं म्हणे. ‘नव्या रक्ताला वाव...तरुण पिढीला संधी’ याबद्दल विचारलं असता, त्यांना काही ऐकूच आलं नाही.
पाठीमागं बसलेले दीपकआबा मात्र हळूच हसले. भंगारात निघालेल्या कारखान्याचं ओझं डोक्यावर असतानाही आपले आबा किती छान हसतात, हे पाहण्यासाठी त्यांच्या संस्थेतले अनेक शिक्षकही तिथं जमलेले. त्यावेळी एकाच्या मोबाईलवर पत्नीचा कॉल आलेला. घाब-या घुब-या आवाजात तिकडून ती सौभाग्यवती आपल्या शिक्षक पतीला विचारत होती, ‘तुमचे दीपकआबा म्हणे पुन्हा निवडणुकीला उभारणार आहेत. म्हणजे आता अजून एका नव्या कर्जाचा हप्ता तुुमच्या पगारातून कट होणार का होऽऽ?’.. लगाव बत्ती.
( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)