मराठा विद्यार्थ्यांकडून ५० टक्केच फी घ्या; सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूचे महाविद्यालयांना आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:35 PM2018-07-13T12:35:56+5:302018-07-13T12:38:09+5:30
सकल मराठा समाजाचे ठिय्या आंदोलनाला मिळाले यश
सोलापूर : सोलापूर विद्यापीठाशी संलग्न ज्या महाविद्यालयांनी मराठा समाजासह आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची फी १०० टक्के घेतली आहे त्यांनी तत्काळ ५० टक्के फी विद्यार्थ्यांना परत करावी, असे आदेश सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिले. तसेच यापुढे सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांकडून ५० टक्केच फी घेतली जाईल, जे महाविद्यालय आदेशाचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी मराठा समाजातील आंदोलक कार्यकर्त्यांना दिले.
शहर व जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था व महाविद्यालयांना आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकडून ५० टक्केच फी घेण्याचे आदेश करण्यात यावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सोलापूर विद्यापीठात कुलगुरूंच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. कुलगुरूंच्या वरील आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
छत्रपती शाहू महाराज शिक्षण शिष्यवृत्ती योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील (ईबीसी) विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात ५० टक्के फी आकारण्यात यावी, असा आदेश महाराष्ट्र शासनाच्या वतीने काढण्यात आला आहे. शासन आदेश असतानाही याची अंमलबजावणी होत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांकडून १०० टक्के फी घेतली जात होती.
सकल मराठा समाजाच्या वतीने या विषयावर आवाज उठविला होता. जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयांना आदेश देण्यात यावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी सोलापूर विद्यापीठात कुलगुरूंच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांनी आंदोलनकर्त्यांना आतमध्ये बोलावून घेतले. मागणी ऐकून घेऊन सविस्तर चर्चा केली आणि तत्काळ त्यांनी संबंधित सर्व कॉलेजना आदेश दिले व ज्या विद्यार्थ्यांची फी १०० टक्के घेतली आहे त्यांना तत्काळ ५० टक्के परत करावी, असा आदेश दिला.
सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांकडून ५० टक्के फी घेतली जाईल, याची काळजी घेऊ. जे महाविद्यालय आदेशाचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्याने कार्यकर्त्यांनी आभार मानले.
यावेळी सकल मराठा समाजाचे माऊली पावर, रवी मोहिते, नगरसेवक विनोद भोसले, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष भाऊसाहेब रोडगे, राष्ट्रवादी विद्यार्थी कार्याध्यक्ष सुहास कदम, जिल्हाध्यक्ष सोमा राऊत आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फी घेतल्यास कारवाई
च्शासनाचे आदेश असतानाही बहुतांश शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालये हे जाणीवपूर्वक आर्थिक दुर्बल घटकातील (ईबीसी) विद्यार्थ्यांकडून १०० टक्के फी घेत आहेत. असा प्रकार घडत असेल तर संबंधित विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. फी घेणाºया महाविद्यालयाच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा सकल मराठा समाजाचे माऊली पवार यांनी दिला आहे.