रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी पोलीसांना आयुर्वेदिक काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 11:48 AM2020-05-15T11:48:05+5:302020-05-15T11:58:18+5:30
पंढरपूर पोलीसांचा उपक्रम; राज्यातील पहिलाच प्रयोग, कोरोनाशी लढण्यासाठी उपाययोजना
पंढरपूर : सध्या राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. हा प्रादुर्भाव रोखताना पोलिसांची दमछाक होत आहे. अशातच आता पोलीस अधिकारी व कर्मचारीही कोरोनाचे बळी पडू लागले आहेत. कोरोनाशी लढताना पोलिसांची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी पंढरपुरातील पोलिसांना आयुर्वेदिक काढा दिला जात आहे. अशा प्रकारचा राज्यातील पहिलाच प्रयोग पंढरपूर पोलिसांसाठी सुरू करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी दिली.
कोरोनाशी लढताना राज्यात आतापर्यंत आठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांना मृत्यूने गाठले आहे, तर सोलापूर जिल्ह्यातही जवळपास १५ हून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांची रोगप्रतिकारकशक्ती वाढवून त्यांना कोरोनापासून वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून पंढरपुरातील सुमारे ५०० पोलिसांना औषधी वनस्पतींपासून तयार केलेला आयुर्वेदिक काढा दिला जात आहे.
पंढरपूर येथील आबासाहेब रणदिवे हे नऊ प्रकारच्या विविध औषधी वनस्पतींपासून हा काढा तयार करतात़ यामध्ये गुळवेल, अश्वगंधा, पिंपळी, कंटकरी, तुरटी, तुळशी, ज्येष्ठ मध, सुंठ, हळद आदी नऊ औषधी वनस्पतींपासून आयुर्वेदिक काढा तयार केला आहे. हा काढा प्रत्येक पोलिसाला दररोज ५० मिलीप्रमाणे एक महिना दिला जाणार आहे.