चारचाकी गाडीच्या काचेला काळी फिल्म लावाल तर एवढा भरावा लागेल दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 02:40 PM2019-07-03T14:40:18+5:302019-07-03T14:43:42+5:30
सोलापूर शहर वाहतुक शाखेचे आवाहन; काळी फिल्म लावलेल्या ५२२ वाहनांवर कारवाई
सोलापूर : चारचाकी वाहनांवरील काळी फिल्म काढा, असा सल्ला देत शहर वाहतूक शाखेच्या वतीने दंडात्मक कारवाईच्या मोहिमेला सुरूवात केली आहे. मोहिमेदरम्यान ५२२ वाहनांवर कारवाई झाली असून, ६८ हजार ६00 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अतिमहत्त्वाच्या लोकांना काळ्या फिल्मची परवानगी आहे.
काचांवर काळी फिल्म लावून राज्यात धावणाºया वाहनचालकांना तत्काळ रोखा. चालकांवर कारवाई करा आणि वाहनांवरील काळी फिल्म काढून टाका, असे आदेश वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विनय कारगावकर यांनी दिले आहेत. त्यामुळे फिल्म लावून धावणाºया वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम सोमवारपासून सुरू केली आहे. केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार, सुरक्षेच्या कारणावरून महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांच्या काचांवर काळी फिल्म लावण्यास परवानगी आहे. झेड आणि झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांच्या काचांवरही काळी फिल्म लावण्याची मुभा आहे. मात्र, अनेक जण आपल्या वाहनांच्या काचांवर काळी फिल्म लावून धावतात.
गैरप्रकारात गुंतलेली मंडळी या काळ्या फिल्मच्या आड काय करतात, ते वारंवार उजेडात आल्यामुळे अभिषेक गोयंका यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका (क्र. २६५/ २०११) दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने वाहनांच्या काचांवर लावलेल्या काळ्या फिल्म तत्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले होते.
या आदेशाची काही दिवस पोलिसांनी अंमलबजावणी केली. आता मात्र जिकडे तिकडे काचांवर काळी फिल्म लावून धावणारी वाहने सर्वत्र आढळतात. अशा वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
न्यायालयाचा अवमान समजला जाईल : पाटील
- शहरातील वाहन चालकांनी या नियमाचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, आदेशाचे उल्लंघन झाल्यास सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात दिलेल्या आदेशाची अवमानना केल्याचे समजण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांनी सांगितले.