सबुरीनं घ्या, कामाला लागा... !

By admin | Published: May 27, 2014 12:55 AM2014-05-27T00:55:29+5:302014-05-27T00:55:29+5:30

रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत : हळव्या कार्यकर्त्यांना सुशीलकुमारांनी दिला धीर

Take the suburinary, work ...! | सबुरीनं घ्या, कामाला लागा... !

सबुरीनं घ्या, कामाला लागा... !

Next

सोलापूर : लोकसभा निवडणुकीतील पराभवाची फारशी चर्चा न करता आता पक्षासाठी जोमानं कामाला लागा़ जनतेत मिसळा, त्यांचे प्रश्न समजून घ्या़ झालं गेलं विसरुन जा, अशा शब्दात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला़ लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर शिंदे यांचे प्रथमच सोलापुरात आगमन झाले़ त्यांच्या स्वागतानंतर ‘जनवात्सल्य’ निवासस्थानी दिवसभर नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची वर्दळ होती़ नेतेमंडळींनी सकाळीच हजेरी लावली़ निवडणुकीत आम्ही काम केले, परंतु मोदी लाट रोखता आली नाही, अशी सामायिक कबुली नेत्यांनी दिली़ कार्यक्षेत्रात विरोधकांना आघाडी का मिळाली याचे खुलासे देण्याऐवजी पक्षांतर्गत विरोधक कसे जबाबदार आहेत, याचे पुरावे देण्याचा केविलवाणा प्रयत्न काही नेत्यांनी केला़ शिंदे यांनी यावर फारशी प्रतिक्रिया न देता ऐकून घेणे पसंत केले़ काही कार्यकर्त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन देत लोकसभा निवडणुकीतील पराभवाबद्दल संवेदना व्यक्त केल्या़ त्यांना धीर देत शिंदे यांनी नव्या जोमाने कामाला लागण्याचा सल्ला दिला़ मोदी लाटेपेक्षा आम्हीच कमी पडलो, प्रचारात त्रुटी राहिल्या़ गाफील राहिल्याचा फटका बसला, अशी प्रांजळ कबुली प्रामाणिक कार्यकर्त्यांनी यावेळी दिली़ त्यांचा हा प्रांजळपणा खुद्द सुशीलकुमार शिंदे यांनाही भावला़ झालं गेलं विसरुन जा, असा सबुरीचा सल्ला त्यांना दिला़ काँग्रेस पक्षाची देशभरात पडझड झाली असली तरी सोलापुरात शिंदे यांचा झालेला पराभव सोलापूरकरांसाठी आत्मपरीक्षण करायला लावणारा असल्याच्या प्रतिक्रिया साहित्य, सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी शिंदे यांच्या भेटीत व्यक्त केल्या़ पक्षाला उभारी देण्यासाठी साहेब तुमची गरज आहे, अशी आर्जव नगरसेवकांनी शिंदे यांना केली. दरम्यान २० जूनपर्यंत आपण परदेशात असल्याने त्यानंतर पुन्हा सोलापूर दौर्‍यावर येणार असल्याचे सांगून पक्षकार्यासाठी पुरेसा वेळ देण्याची तयारी सुशीलकुमार शिंदे यांनी दर्शविली़ दिवसभरात काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते-पदाधिकार्‍यांशी शिंदे यांनी चर्चा केली़ त्यांच्याकडून पराभवाची कारणमीमांसा जाणून घेतली़ ‘जनवात्सल्य’मध्ये भेटणार्‍यांत ज्येष्ठ नेते विष्णुपंत कोठे, बिपीनभाई पटेल, मनोहर डोंगरे, राजकुमार राठी, महेश गादेकर, बाळासाहेब शेळके, महापौर अलका राठोड, प्रकाश यलगुलवार, राजशेखर शिवदारे, सुरेश हसापुरे, भीमाशंकर जमादार, जाफरताज पाटील, माजी आमदार राजन पाटील, प्रकाश चौरे, प्रकाश पाटील, दीपक माळी, अशपाक बळोरगी, शिवाजी काळुंगे यांचा समावेश होता़

------------------------------

युन्नूसभार्इंच्या टिप्स्

माजी आमदार युन्नूसभाई शेख यांनी सुशीलकुमार शिंदे यांची आज आवर्जून भेट घेतली़ त्यांनी निवडणुकीदरम्यान पक्षाची प्रचार यंत्रणा, त्यातील त्रुटी याची माहिती दिली़ वृत्तपत्रातून त्यांनी मांडलेल्या सूचना तसेच पुढील काळात विधानसभा निवडणुकीसाठी घ्यावयाची काळजी, अल्पसंख्याक समाजाच्या संदर्भातील भूमिका यावर महत्त्वाच्या टिप्स त्यांनी शिंदे यांना दिल्या़

 

Web Title: Take the suburinary, work ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.