आम्हाला माणसांत घ्या ओ साहेब...प्रकाश आंबेडकरांसमोर त्या महिलेची आर्त हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 05:47 PM2019-02-04T17:47:23+5:302019-02-04T17:49:59+5:30
सोलापूर : आम्हाला माणसात घ्या, आमच्या समाजावर बसलेला चोरीचा शिक्का पुसा़ आम्हाला करून खायला शेती द्या़ रहिवासी दाखला मिळत ...
सोलापूर : आम्हाला माणसात घ्या, आमच्या समाजावर बसलेला चोरीचा शिक्का पुसा़ आम्हाला करून खायला शेती द्या़ रहिवासी दाखला मिळत नाही़ जातपडताळणी मिळत नाही़ रेशनकार्ड मिळत नाही़ आमच्यात कोण शिकलेला नाही़ मंगळवेढा तहसीलदार आम्हाला रेशनकार्ड देत नाही़ साहेब! आम्हाला माणसात घ्या, आम्हीपण एक माणूसच आहे ना! अशी आर्त हाक पारधी समाजाच्या अंजना पवार यांनी दिली.
माळीनगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भारतीय बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले होते़ यावेळी माजी आ़मदार हरिदास भदे, लक्ष्मण माने, अॅड़ विजयराव मोरे, रंजन गिरमे, भटके विमुक्त राज्यप्रमुख अरुण जाधव, किसन चव्हाण, शंकराव लिंगे, धम्मपाल माशाळकर, नवनाथ पडळकर आदी उपस्थित होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, निवडणुका जवळ आल्या की यांना राम मंदिर आठवते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेशी दौरेही कमी झाले आहेत़ आरएसएस व सनातन ही खोटारडी संघटना आहे़ यांना बंदुका, बॉम्ब कशासाठी लागतात? अशांना जेलमध्ये पाठवले पाहिजे़ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अर्थसंकल्पातून केलेल्या घोषणा हा एक जुमला आहे़ मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, परंतु हे मराठा आरक्षण देण्यासाठी कोणते निकष लावले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
७० वर्षांपासून काँग्रेसबरोबर होतो, परंतु त्यांनी आम्हाला काय दिले, असा सवाल करत प्रकाश आंबेडकर म्हणाले, नदीकिनारी राहणारा कोळी व भोई समाज यांच्या जमिनी लिलाव पद्धतीने घेऊन त्यांचे संसार उद्ध्वस्त करण्याचे काम या सरकारने केले आहे़ मी आता जिंकण्यासाठी रिंगणात उतरलो आहे़ आता कुणाला भीक मागणार नाही़ कोणाचीही दडपशाही चालू देणार नाही़ वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्वच्या सर्व ४८ जागा लढवणार आहे, असे सांगत माढा लोकसभा मतदारसंघातून अॅड़ राजाभाऊ मोरे यांना तर जळगाव रावेर मतदारसंघातून कोळी समाजाच्या उमेदवाराला संधी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.