आम्हाला लवकर मायदेशात न्या; अकलूजकरांची आर्त विनवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 11:25 AM2020-03-11T11:25:36+5:302020-03-11T11:27:54+5:30
इराणमध्ये अडकले पश्चिम महाराष्टÑातील ४४ पर्यटक; शरद पवारांनी साधला संवाद
सोलापूर / कोल्हापूर : येथील आल्हाददायक वातावरणापेक्षा भारतातील वातावरण केव्हाही चांगले आहे. त्यामुळे आम्हाला इथून लवकरात लवकर मायदेशी परत न्या, अशी आर्त विनवणी इराणमध्ये गेल्या २० दिवसांपासून अडकलेल्या कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यातील ४४ पर्यटकांनी केली आहे. वैद्यकीय पथक दाखल होऊन चार दिवस उलटले तरी अद्याप पर्यटकांची तपासणी केलेली नाही. त्यामुळे त्यांची घालमेल वाढली आहे. दरम्यान, राष्टÑवादी कॉँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दूरध्वनीवरून पर्यटकांची विचारपूस करून दिलासा दिला. तसेच त्यांनी पर्यटकांना भारतात आणण्यासंदर्भात लवकर कार्यवाही करावी, असे पत्र केंद्रीय परराष्टÑ मंत्री एस. जयशंकर यांना लिहिले आहे.
तेहरान, इराणमध्ये अडकलेले पर्यटक हे कोेल्हापूर, सांगली, अकलूज (सोलापूर), पुणे येथील आहेत. कोरोना विषाणू भीतीच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणीसाठी भारतातून गुरुवारी (दि.५) पथक इराणमध्ये दाखल झाले आहे. यामध्ये तीन तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. पाच दिवस झाले तरी अद्याप या पथकाकडून पर्यटकांची तपासणी करण्यात आलेली नाही.
या संदर्भात सहल आयोजक मुन्ना सय्यद हे वरचेवर जाऊन भारतीय वकिलातीमधील अधिकाºयांशी संपर्क साधत आहेत. परंतु त्यांच्याकडून ठोस असे कोणतेही उत्तर मिळत नाही. त्यामुळे पर्यटकांमध्ये बेचैनी व घालमेल वाढली आहे. आम्हाला मायदेशी लवकरात लवकर न्यावे, अशी आर्त विनवणी या पर्यटकांनी केली आहे. नुकतेच इराणमध्ये अडकलेले ५०हून अधिक काश्मीरसह आसपासच्या भागातील पर्यटक भारतीय वायूसेनेच्या विमानातून भारतात दाखल झाले. त्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये अडकलेल्या महाराष्टÑातील पर्यटकांचेही डोळे त्याकडे लागून राहिले आहे.
वीस दिवसांपासून अडकून पडले
- इराण व इराक येथील धार्मिक व पर्यटनस्थळांच्या सहलीसाठी आयोजक मुन्ना सय्यद यांच्या नेतृत्वाखाली ४४ पर्यटक २१ फेब्रुवारीला तेहरानमध्ये दाखल झाले. पुढे इराकमध्ये प्रवेश बंद झाल्याने ते या ठिकाणी अडकून पडले आहेत. वीस दिवस उलटले तरी अद्याप त्यांचा मायदेशी परतण्याचा मार्ग खडतरच झाला आहे. वृध्द पर्यटकांची औषधेही संपली आहेत. वकिलातीकडून त्याची व्यवस्था न झाल्याने सहल आयोजक सय्यद यांनीच ती स्वत: खरेदी केली आहेत.
सर्व पर्यटकांची तब्येत ठणठणीत आहे. खाण्यापिण्याची कोणतीही अडचण नाही. तपासणीसाठी वैद्यकीय पथकही दाखल झाले आहे. परंतु अद्याप तपासणी सुरू झाली नसल्याने पर्यटकांमध्ये थोडी घालमेल वाढली आहे. भारतीय वकिलातीशी संपर्क सुरू असून अद्याप कोणताही निरोप आलेला नाही. त्या निरोपाच्या प्रतीक्षेत आहोत.
-मुन्ना सय्यद, सहल आयोजक