दिवाळीत फुप्फुसाची घ्या सर्वात जास्त काळजी; फटाके, धुरापासून दूर राहा
By Appasaheb.patil | Published: October 20, 2022 04:25 PM2022-10-20T16:25:11+5:302022-10-20T16:25:18+5:30
पेंटिंगच्या वासाचाही धोका; कायमचे किंवा तात्पुरते बहिरेपण येऊ शकते
सोलापूर : दिवाळी म्हटली की, फटाक्यांची आतषबाजी ही आलीच. त्याचे आकर्षण सर्वांनाच असते. मात्र, फटाके सावधपणे न फोडल्यास मोठी हानी होऊ शकते. फटाक्यांमुळे देशात दरवर्षी सुमारे पाच हजारांवर लोकांची दृष्टी जाते, तर फटाक्यांच्या आवाजामुळे कायमचे किंवा तात्पुरते बहिरेपण येऊ शकते.
दरवर्षी असे सुमारे पाच टक्के रुग्ण कानांच्या गंभीर समस्यांनी त्रस्त होतात. फटाक्यांच्या वायू प्रदूषणामुळे दम्यासह विविध आजारही वाढतात. त्यामुळेच फटाके फोडताय सावधान, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. दिवाळी हा अतिशय व्यस्त आणि तणावाचा काळ असतो. स्वयंपाकघरांमध्ये सतत लगबग सुरू असते. दिवे, रोषणाई केली जाते आणि फटाक्यांची आतषबाजी केली जाते. परंतु साजरीकरणाबरोबरच काही काळजीही घेतली पाहिजे. दिवाळीमध्ये शरीरावर कुठेतरी भाजले जाणे स्वाभाविक असते आणि ही दुखापत सौम्य ते तीव्र स्वरूपाच्या भाजण्याच्या जखमा अशी असू शकते.
---
अचानक फुटणारे फटाके कानासाठी घातक...
आवाजामुळे कानात दडे बसणे, कान दुखणे, डोके दुखणे यांपासून कानाचा पडदा फाटणे, कायमचे किंवा तात्पुरते बहिरेपण येण्यापर्यंतचे त्रास होऊ शकतात. तात्पुरते बहिरेपण आल्यास औषधोपचाराने ते काही दिवसांमध्ये पूर्ववत होऊ शकतात. मात्र, कायमस्वरूपी बहिरेपणही येऊ शकते. त्याच वेळी फटाक्यांच्या रसायनयुक्त धुरामुळे नाक, कान, घसा व फुफ्फुसांमध्ये जंतुसंसर्ग होणे, खाज सुटणे आदी समस्याही निर्माण होतात.
---
फटाके फोडताना काय काळजी घ्याल?
- - फटाके फोडत असताना ते पेटवल्यावर योग्य अंतर राखा.
- - जळते फटाके हातात घेऊ नका किंवा हवेत उडवू नका.
- - फटाक्यांच्या आजूबाजूला लहान मुले वावरत असल्यास लक्ष ठेवणे गरजेचे.
- - नेहमी पाण्याची बादली जवळ ठेवा.
- - रस्त्यावर अनेक लोक फटाके उडवत असल्याने हेल्मेट घालावे.
- - स्वतःच्या मनाने औषधे घेऊ नका किंवा घरात उपलब्ध असलेले ड्रॉप वापरू नका
---
हे प्रथमोपचार करू शकता...
गरम तेल किंवा बाहेरचे घटक डोळ्यात जाणे अशा सौम्य त्रासाच्या बाबतीत पिण्याचे स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात डोळ्यावर मारून डोळा पूर्णपणे स्वच्छ धुवावा किंवा कपभर पाणी डोळ्याच्या जवळ ओतत राहा आणि डोळ्यांची सतत उघडझाप करा. डोळ्यात गेलेले बाहेरचे घटक काढून टाकण्यासाठी आणि योग्य औषधे समजून घेण्यासाठी नेत्रचिकित्सकांचा सल्ला घ्या.
---
या लक्षणांकडे दुर्लक्ष नको
हवेतील प्रदूषणामुळे दम लागणे, छातीत टोचल्यासारखे वाटणे, घशात सूज येणे, सर्दी आणि प्रचंड शिंका येणे, जीव घाबरणे, ॲलर्जीक खोकला येणे, छातीत घरघर होणे आदी लक्षणे दिसताच, डॉक्टरांचा सल्ला घ्या. या दिवसांत अस्थमाच्या रुग्णांनी डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे महत्त्वाचे ठरते.