मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी घेतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:19 AM2021-05-30T04:19:18+5:302021-05-30T04:19:18+5:30
पंढरपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांना गावांतच उपचार ...
पंढरपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांना गावांतच उपचार मिळावेत यासाठी गावागावांत लोकसहभागातून कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. पंढरपूर तालुक्यातील मौजे तावशी तसेच ६५ एकरवरील कोविड केअर सेंटरला मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी भेट देऊन सोयी- सुविधांची पाहणी केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी मौजे तावशी व ६५ एकरमधील कोविड केअर सेंटर्सची पाहणी केली व डॉक्टर्स व कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. तसेच दाखल कोरोनाबाधित रुग्णांशी संवाद साधून तेथील व्यवस्थेची पाहणी केली. तसेच ६५ एकर येथील कोविड केअर सेंटर येथे मानसिक ताणतणाव व्यवस्थापनाबाबत कार्यशाळेतही त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सर्व यंत्रणा उत्तमरीत्या काम करीत असून येथील व्यवस्था व पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा व घेण्यात येणाऱ्या काळजीबद्दल रुग्णांनी समाधान व्यक्त केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी व आशा वर्कर हे करत असलेल्या कामाबद्दल त्यांनी कौतुक केले.
यावेळी तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेताना स्वामी म्हणाले, प्रत्येक गावांत ग्रामस्तरीय समित्या सक्रिय कराव्यात. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा त्वरित शोध घेऊन तपासणी करा. कोणताही कोरोनाबाधित रुग्ण घरी उपचार घेणार नाही याची दक्षता घ्या. प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे. जास्त रुग्णसंख्या असलेल्या गावांतील जास्तीत जास्त नागरिकांची कोरोना चाचणी करण्यावर भर द्या, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम, डॉ. जानकर आदी उपस्थित होते.
फोटो : ६५ एकर परिसरातील कोविड केअर सेंटरची पाहणी करताना मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी, प्रांताधिकारी सचिन ढोले, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम, डॉ. जानकर.