राहत्या घरातच १० हजारांची लाच घेताना तलाठ्यास पकडले; कुर्डूवाडी तालुक्यातील घटना
By Appasaheb.patil | Published: March 13, 2023 08:04 PM2023-03-13T20:04:57+5:302023-03-13T20:05:55+5:30
सोलापूर : शेतजमिनीची फोड करून विभक्त करण्याची कार्यवाही करण्यासाठी व त्याबाबतचा ७/१२ उतारा देण्याकरिता तलाठ्याने ३५ हजाराची मागणी केली ...
सोलापूर : शेतजमिनीची फोड करून विभक्त करण्याची कार्यवाही करण्यासाठी व त्याबाबतचा ७/१२ उतारा देण्याकरिता तलाठ्याने ३५ हजाराची मागणी केली होती, यांपैकी पहिला हफ्ता म्हणून १० हजार रूपयाची रक्कम घेताना संबंधित तलाठ्याला रंगेहात पकडले आहे. सहदेव शिवाजी काळे (वय ५४) असे लाच घेणाऱ्या तलाठ्याचे नाव आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले की, शेतजमिनीची फोड करून विभक्त करण्याकरिता तक्रारदार यांनी सज्जा कार्यालय, दहिवली येथे अर्ज केला होता. सदर अर्जानुसार शेतजमिनीची फोड करून विभक्त करण्याची कार्यवाही करण्यासाठी व त्याबाबतचा ७/१२ उतारा देण्याकरिता तलाठी यांनी ३५ हजाराची मागणी केली होती. तडजोडीअंती ३० हजार रूपये स्वीकारण्याचे मान्य करून त्यातील पहिला हप्ता १० हजार रूपये लाच रक्कम निवासस्थानी स्वीकारले असता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूरच्या पथकाने रंगेहात पकडले.
दरम्यान, ही कारवाई पर्यवेक्षक अधिकारी गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदार पकाले, जाधव, सण्णके, चालक पोलिस शिपाई सुरवसे यांनी बजाविली.