तलाठी कार्यालयास कुलूप ठोकले ! होटगी येथील घटना; गारपीटग्रस्तांचा आक्रोश
By admin | Published: May 7, 2014 08:43 PM2014-05-07T20:43:30+5:302014-05-07T23:30:32+5:30
दक्षिण सोलापूर :
दक्षिण सोलापूर :
गारपीटग्रस्त लाभार्थींची यादी देण्यास टाळाटाळ केली, चुकीचे पंचनामे केले, अनुदानाची रक्कम बँक खात्यावर जमा केली नाही आदी कारणांनी चिडलेल्या होटगीच्या शेतकर्यांनी आज तलाठी कार्यालयास कुलूप ठोकले.
होटगी परिसराला गारपिटीने आणि अवकाळी पावसाने झोडपल्याने मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे झाले असले तरी त्यात अनेक त्रुटी आहेत. चुकीचे पंचनामे केल्याने अनुदान कमी मिळाले. बँक खात्यात रक्कम जमा होण्यास विलंब आदी कारणांनी शेतकरी संतप्त झाले होते.
शेतकर्यांनी वारंवार तलाठी प्रदीप जाधव यांच्याशी सपंर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तलाठ्याकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे चिडलेल्या शेतकर्यांनी तलाठी कार्यालयाकडे मोर्चा वळविला. सरपंच महानंदा पाटील यांचे पती उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली तलाठी कार्यालयात कुलूप ठोकून त्यांनी निषेध नोंदविला.
तलाठी प्रदीप जाधव हे शासकीय कामात व्यस्त होते. सोरेगाव येथील ए. जी. पाटील इंजिनिअरींग कॉलेजमध्ये महत्त्वाच्या कामात व्यस्त असल्याचा निरोप त्यांनी शेतकर्यांपर्यंत पोहचवला. काही तासांनंतर कुलूप काढण्यात आले.
कोट
नुकसान झालेल्या शेतकर्यांना वालीच उरला नाही. तलाठी त्यांनाच काय आम्हालाही दाद देत नाही. त्यामुळे कार्यालयास कुलूप ठोकले
उत्तम पाटील, होटगी
अनुदान रकमेच्या याद्यांची झेरॉक्स प्रत दिली आहे. माझ्याविषयी किंवा कार्यपध्दतीविषयी त्यांचा राग नाही तर अनुदान वेळेत जमा झाले नाही हा त्यांचा राग आहे.
प्रदीप जाधव, तलाठी होटगी