पूर अनुदानात अपहार केल्याने तलाठी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:19 AM2021-01-04T04:19:42+5:302021-01-04T04:19:42+5:30
अक्कलकोट (जि. सोलापूर) : पूरग्रस्तांच्या अनुदानात अपहार केल्याप्रकरणी अक्कलकोट तालुक्यातील तडवळ भागातील टी. व्ही. सरवदे या तलाठ्याची चौकशी ...
अक्कलकोट (जि. सोलापूर) : पूरग्रस्तांच्या अनुदानात अपहार केल्याप्रकरणी अक्कलकोट तालुक्यातील तडवळ भागातील टी. व्ही. सरवदे या तलाठ्याची चौकशी करून निलंबित करण्यात आले. ही कारवाई तहसीलदार यांच्या अहवालानुसार प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी केली.
२०१९मध्ये जुलै, ऑगस्ट या महिन्यात तडवळ भागात सीना-भीमा नदीला महापूर आला होता. त्यामुळे त्या भागातील अनेक गावांच्या शिवारातील शेकडो शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झालेले होते. त्यामुळे त्याचा पंचनामा करून शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई दिली होती. त्यामध्ये तलाठी सरवदे यांनी मूळ शासकीय अभिलेखात फेरफार करून शासकीय रकमेचा अपहार केल्याची माहिती तहसीलदार अंजली मरोड यांना मिळाली. खर्ची पडलेली रक्कम व शेतकऱ्यांचे नाव याची प्राथमिक चौकशी केली. त्यामध्ये मूळ अभिलेखात बदल केल्याचे निदर्शनास आले. तपासणी केली असता अपहार झाल्याची खात्री झाली.
त्यानुसार संबंधितांवर कारवाई होण्यासाठी प्रस्ताव तहसीलदारांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठवून दिला. त्यानंतर पुन्हा चौकशी केली. त्यात खरा प्रकार उघडकीस आला. त्यावरून सरवदे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.