पूर अनुदानात लाखो रुपयांचा अपहार केल्याने तलाठी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:19 AM2021-01-04T04:19:57+5:302021-01-04T04:19:57+5:30
२०१९मध्ये जुलै, ऑगस्ट या महिन्यात तडवळ भागात सीना-भीमा नदीला महापूर आला होता. त्यामुळे त्या भागातील अनेक गावांच्या शिवारातील शेकडो ...
२०१९मध्ये जुलै, ऑगस्ट या महिन्यात तडवळ भागात सीना-भीमा नदीला महापूर आला होता. त्यामुळे त्या भागातील अनेक गावांच्या शिवारातील शेकडो शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झालेले होते. त्यामुळे त्याचा पंचनामा करून नुकसानीत शेतकऱ्यांचे शासनाने नुकसानभरपाई दिले होते. त्यामध्ये तलाठी सरवदे यांनी मूळ शासकीय अभिलेखात फेरफार करून लाखो रुपयांच्या शासकीय रकमेचा अपहार माहिती तहसीलदार अंजली मरोड यांना मिळाली. त्यावरून खर्ची पडलेली रक्कम व शेतकऱ्यांचे नाव याची प्राथमिक चौकशी केली. त्यामध्ये मूळ अभिलेखात बदल केल्याचे निदर्शनास आले. त्यावरून सविस्तर माहिती घेऊन तपासणी केली असता अपहार झाल्याची खात्री झाली.
त्यानुसार संबंधितांवर कारवाई होण्यासाठी प्रस्ताव तहसीलदारांनी उपविभागीय अधिकारी सोलापूर-२ दीपक शिंदे यांच्याकडे पाठवून दिले. त्यानंतर पुन्हा चौकशी केली. त्यात खरा प्रकार उघडकीस आला. त्यावरून सरवदे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत तलाठी सरवदे यांना यापूर्वी खुलासा नोटीस पाठविली होती. मात्र समाधानकारक उत्तर दिले नाही म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे आदेशात नमूद केले आहे. यापुढील कालावधीत सरवदे यांना तहसीलदार यांच्या आदेशाशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच त्यांच्यावर विभागीय चौकशी करण्याचे आदेश काढले आहे.