चर्चा रंगली लंडनची.. दावा मात्र नवी दिल्लीतला, भालकेंचा फोटो व्हायरल शर्ट अन् पँटमधला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 12:28 PM2020-02-11T12:28:03+5:302020-02-11T12:29:54+5:30
सोशल मीडियावर छायाचित्र झळकली; मंचरदेवी, रामदेवबाबा आश्रमासही दिल्या भेटी
पंढरपूर : तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल कारखान्याचा प्रश्न लोंबकळत ठेवून आमदार भारत भालके लंडनला गेल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. मात्र आपण कारखान्याच्या कामासाठी दिल्लीत ठाम मांडून बसल्याचा दावा भारतनानांनी केला़ दरम्यान, या गदारोळात शर्ट आणि पँटमधील आमदाराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आमदार भालके यांचा दिल्ली विमानतळावरील जीन्स पँट, फॉर्मल शर्टवरील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे़ यारून ते लंडनला गेल्याची चर्चा आहे़ प्रत्यक्षात ते दिल्ली येथे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भातील कामासाठी गेल्याचा दावा खुद्द भालके यांनी केला आहे.
विठ्ठल सहकारी साखर कारखाना तसेच चेअरमन आ. भारत भालके हे सध्या विविध कारणांनी चर्चेत आहेत. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम यंदा सुरू झालेला नाही़ तसेच कामगारांचा पगार थकीत आहे. बॅँकांकडून कर्ज मिळावे, यासाठी संचालक मंडळाकडून प्रयत्न सुरू आहेत.
एनसीबीसीकडून कर्जाचे हप्ते वाढून मिळावेत, यासाठी चेअरमन आ. भारत भालके दिल्लीत गेले आहेत. पुढचे दोन ते तीन दिवस त्यांना त्याठिकाणी थांबावे लागत असल्याने त्यांनी मंचरदेवी तसेच रामदेवबाबा आश्रम या ठिकाणास भेट देऊन मुक्काम केला.
यादरम्यान त्यांनी विमानतळावर जीन्स पँट व फॉरमल हाफ शर्ट घातल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यापूर्वी १९८१ साली खा. शरद पवार यांच्यासोबतचा पँट, शर्ट घातलेला फोटो पाहायला मिळालेला होता. त्यानंतर प्रथमच सार्वजनिक ठिकाणी जीन्स पँट व हाफ शर्टमध्ये आ. भालके दिसून आल्याने हा फोटो ते लंडनमधील असल्याचे म्हणून व्हायरल झाला आहे. प्रत्यक्षात ते दिल्लीतच आहेत़ त्यांच्यासोबत शिवसेनेचे संजय कोकाटे हे सुद्धा आहेत.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात आंदोलन करणाºयांकडून अशा प्रकारचे कृत्य करण्यात येत असल्याचा आरोप आ. भालके यांनी केला आहे.
केवळ आफवा..
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामानिमित्त मी दिल्लीत आलेलो आहे. तीन-चार दिवस याठिकाणी थांबावे लागत असल्याने मंचरदेवी व रामदेवबाबा आश्रमास भेट दिली. आमदार असल्याने २० हजार किमीचा विमान प्रवास मोफत आहे. मी लंडनला गेल्याच्या केवळ आफवा आहेत, असे विठ्ठल कारखाना चेअरमन आमदार भारत भालके यांनी सांगितले.
विठ्ठल सहकारी साखर कारखाना कामगारांच्या प्रश्नावर चेअरमन आ. भारत भालके व व्हा. चेअरमन लक्ष्मण पवार यांच्या दालनासमोर दोन तास धरणे आंदोलन केले. कामगारांच्या प्रश्नावर आपण खा. शरद पवार यांची बारामती येथे जाऊन भेट घेणार आहे़
- अमरजीत पाटील, अध्यक्ष, कर्मवीर औदुंबरअण्णा पाटील प्रतिष्ठान