बिबट्याच्या चर्चेने आता कोंडी परिसरातही भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:23 AM2021-07-28T04:23:30+5:302021-07-28T04:23:30+5:30
उत्तर सोलापूर : कोंडी येथील औद्योगिक वसाहतीत दाट झाडीमध्ये बिबट्या हिंस्र प्राणी दिसून आला आहे. वसाहतीतील एलएचपी उद्योग समूहाच्या ...
उत्तर सोलापूर : कोंडी येथील औद्योगिक वसाहतीत दाट झाडीमध्ये बिबट्या हिंस्र प्राणी दिसून आला आहे. वसाहतीतील एलएचपी उद्योग समूहाच्या कारखान्यालगत झुडुपातून रस्ता ओलांडताना हा प्राणी निदर्शनास आल्याचा दावा कामगारांनी केला आहे. माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांना या हिंस्र प्राण्याच्या पायांचे ठसे आढळले असून, ते ठसे बिबट्याचेच (हिंस्र प्राण्याचेच) असण्याची शक्यता वर्तवली आहे. या घटनेच्या चर्चेमुळे औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार यांच्यासह कोंडी, अकोलेकाटी, बीबीदारफळ परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत.
काही दिवसांपासून चिंचोळी औद्योगिक वसाहतीच्या परिसरात हिंस्र प्राणी दिसत असल्याची चर्चा होती. मात्र त्या अफवा असल्याचे सांगितले जात होते. मंगळवारी सकाळी आठ वाजता कामावर जाणाऱ्या कामगारांनी एलएचपी कारखान्यालगत झुडपांत एक हिंस्र प्राणी रस्ता ओलांडताना दिसला, असा दावा केला आहे. कामगारांनी तो प्राणी पाहिल्यानंतर त्याची माहिती औद्योगिक वसाहत व परिसरातील नागरिकांना दिली.
या घटनेची माहिती प्रादेशिक वन्यजीव विभागाला मिळताच त्यांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी करून तपासणी केली. या वेळी वनरक्षक यशोदा आदलिंगे, अनिता शिंदे, वनपाल शंकर कुताटे यांनी चिखलामध्ये उमटलेल्या ठशांची पाहणी केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ठसे बिबट्याचे असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. यामुळे दुपारनंतर विभागाच्या वतीने परिसरात ध्वनिक्षेपकावरून हिंस्र प्राण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली.
----
औद्योगिक परिसरात हिंस्र प्राणी दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली. प्राथमिक अंदाजानुसार तो प्राणी बिबट्या असण्याची शक्यता आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी काय काळजी घ्यावी याबाबत जागरूकता सुरू केली आहे.
- जयश्री पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी
----
२७ बिबट्या
कोंडी औद्योगिक वसाहतीत मंगळवारी हिंस्र प्राणी निदर्शनास आला असून, वन विभागाच्या पथकाने त्याच्या ठशांचे निरीक्षण केले.