गोड बोला..ग़ुड बोला; गोड बोलण्यासाठी अंत:करणात प्रेम, आपुलकी असावी लागते : विजयकुमार देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 05:13 PM2019-01-21T17:13:42+5:302019-01-21T17:14:57+5:30
भारतीय परंपरेत प्रत्येक सणाची वेगळी ओळख आहे. यात मकर संक्रांतीचा गोड बोलण्याचा संस्कार महत्त्वाचा आहे. आपल्या जीवनाची वाटचाल नेहमी ...
भारतीय परंपरेत प्रत्येक सणाची वेगळी ओळख आहे. यात मकर संक्रांतीचा गोड बोलण्याचा संस्कार महत्त्वाचा आहे. आपल्या जीवनाची वाटचाल नेहमी योग्य दिशेने होण्यासाठी सर्वांशी गोड बोलणे महत्त्वाचे आहे. इतरांशी सुसंवाद साधणे, त्यांच्याशी मधूर बोलण्यासाठी अंत:करणात मात्र प्रेम आणि आपुलकी असणे अतिशय महत्वाचे आहे.
कोणताही बदल सकारात्मक नजरेने स्वीकारत पुढे जाण्याची सवय या संस्कारामुळे होते. यातील भाषिक संवाद होण्यासाठी गोड बोलणे ही व्यवहाराची गरज असते. गोड बोलल्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल सकारात्मक भाव निर्माण होतात. कोणत्याही व्यवहारात काहीतरी देवाण-घेवाणीच्या गोष्टी असतात. व्यवहार आला की, त्याचबरोबर अडचणी ठरलेल्या असतात. यातून माणसाचे संवाद दुरावतात.
व्यवहारात आपण कुणाला तरी कळत-नकळत दुखावत असतो. पण जर त्यामध्येही सकारात्मकता ठेवेली तर व्यवहारही गोडीमध्येच होतो. राजकारण्यांना तर सर्वांची कामे करावी लागतात, तरीही काम नाही झाले की कोणीतरी दुखावतोच. समोरचा कसाही वागला, बोलला तरी आपल्या अंत:करणात त्याच्याविषयी क्षमा, दया, अशी सद्भावनाच असावी, असे मी मानतो. त्यामुळे गोड बोलणे हे केवळ स्वार्थ किंवा भीतीपोटी असू नये. काहीवेळा सत्य सांगितल्यावर इतरांना वाईट वाटते. हे सांगणे आपल्या हृदयापासून आले तर तर त्यालाही बरे वाटेल, त्यासाठी संक्रांतीचा योग चांगला आहे. संक्रांत हा सण विशेषत: युवकांसाठी महत्त्वाचा आहे. तरूण वयात जोश असतो.
-विजयकुमार देशमुख, पालकमंत्री